जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 14:55 IST2025-12-27T14:55:03+5:302025-12-27T14:55:42+5:30
जिममध्ये जाऊन बॉडी बनवणाऱ्या १९ वर्षीय बीएससीच्या विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू झाला आहे.

AI फोटो
उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात जिममध्ये जाऊन बॉडी बनवणाऱ्या १९ वर्षीय बीएससीच्या विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने अवघ्या १६ दिवसांपूर्वीच जिम जॉईन केली होती. याच दरम्यान, लवकरात लवकर बॉडी बनवण्याच्या नादात तो जिममधून मिळालेली प्रोटीन पावडर पिऊ लागला होता.
प्रोटीन पावडर प्यायल्यानंतर दोन दिवसांनी विद्यार्थ्याच्या पोटात अचानक खूप वेदना सुरू झाल्या आणि त्याला उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर त्याच्या तोंडात सूज आली. हे पाहून कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी घाईघाईने त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला कानपूरला रेफर केलं.
१४ दिवस उपचारानंतर मृत्यूशी झुंज अपयशी
कानपूरमध्ये १४ दिवस उपचार चालल्यानंतर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. विद्यार्थ्याच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह तालग्राम पोलीस ठाण्यात ठेवून निदर्शने केली. जिम चालकाने चुकीच्या पद्धतीने प्रोटीन पावडर दिली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. नातेवाईक जिम चालकावर कारवाईची मागणी करत होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी जिम चालकावर एफआयआर दाखल करत जिम सील केली, त्यानंतर हे प्रकरण शांत झालं.
पावडर फुफ्फुसात गेल्याने ब्लड सर्क्युलेशन थांबलं
विकास जिममध्ये व्यायाम करताना प्रोटीन शेक प्यायला होता. विकासचा भाऊ सत्य प्रकाश याने सांगितलं की, प्रोटीन शेक प्यायल्यानंतर विकासची प्रकृती बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथील डॉक्टरांनी सांगितलं की, पावडर प्यायल्यामुळे विद्यार्थ्याला उलट्या, पोटदुखी आणि चेहऱ्यावर सूज आली आहे. उलट्या झाल्यामुळे ती पावडर त्याच्या फुफ्फुसात गेली आणि तिथे जाऊन साचली. यामुळे शरीरातील रब्लड सर्क्युलेशन नीट होत नव्हते. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला कानपूरला हलवण्यात आलं होतं, जिथे १४ दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.