कर्नाटक विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ; भाजपचे १८ आमदार ६ महिने निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 08:03 IST2025-03-22T08:01:47+5:302025-03-22T08:03:02+5:30
निलंबित केलेल्यांमध्ये भाजपचे मुख्य प्रतोद डोड्डनगौडा पाटील, सी. एन. अश्वथ नारायण, बी. ए. बसवराजू, आदी आमदारांचा समावेश आहे.

कर्नाटक विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ; भाजपचे १८ आमदार ६ महिने निलंबित
बंगळुरू : कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यू. टी. खादर यांचा कथितरीत्या अनादर केल्याच्या आरोपावरून भाजपच्या १८ आमदारांना सहा महिन्यांसाठी शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांचे आसन असलेल्या मंचावर भाजप आमदार चढले व कागद भिरकावले. कर्नाटकात मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याला विरोध दर्शवताना हा प्रकार घडला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सभागृहाला संबोधित करत असताना भाजप सदस्यांनी हा गदारोळ केला. निलंबित केलेल्यांमध्ये भाजपचे मुख्य प्रतोद डोड्डनगौडा पाटील, सी. एन. अश्वथ नारायण, बी. ए. बसवराजू, आदी आमदारांचा समावेश आहे.
हनी ट्रॅप आरोपांच्या चौकशीची मागणी
भाजप व जनता दल (एस.) ने कर्नाटक विधानसभेत गदारोळ केला व एक मंत्री, अन्य नेत्यांशी संबंधित हनी ट्रॅपच्या प्रयत्नाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी सदस्य विधानसभा अध्यक्षांच्या जवळ गेले व हातात सीडी घेऊन नारेबाजी करू लागले.