रघुनाथ पांडे - नवी दिल्लीविद्यापीठांकडे असलेला परीक्षा घेण्याचा अधिकार आता त्याच्या हातून जाण्याची शक्यता असून, दहावी- बारावीप्रमाणेच महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा एकत्रित घेण्यासाठी ‘विद्यापीठ परीक्षा मंडळ’ निर्मितीची योजना तयार केली जाणार आहे. या परीक्षा मंडळाचा कारभार आयएएस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालेल. सध्या तरी एवढेच ठरले असून, याबाबत फेब्रुवारीमध्ये राजधानीत होणाऱ्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम रूप येईल. महाराष्ट्राने या योजनेसाठी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्राने दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या बैठकीत राज्याने हा विचार बोलून दाखविल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली, तर ‘लोकमत’शी बोलताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. शैक्षणिक विकासापेक्षा परीक्षेच्या नियोजनात व्यग्र असलेल्या कुलुगुरूंना परीक्षा व्यवस्थेतून बाहेर काढण्यासाठी ही योजना असल्याचे सांगण्यात आले.वास्तविक, उत्तम संशोधन व्हावे, त्याचा उपयोग देशविकासासाठी व्हावा, असा विद्यापीठांच्या स्थापनेमागील एक उद्देश आहे. मात्र सध्या विद्यापीठाचा हा उद्देश परीक्षांच्या गदारोळात हरवून गेल्याने आयएएस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सर्वच विद्यापीठांचे एक ‘विद्यापीठ परीक्षा मंडळ’ असावे असा विचार पुढे आला आहे. सध्या कोणतीच स्पष्टता या योजनेमागे नसून, विद्यापीठांच्या कुलगुरूपासून शिक्षणतज्ज्ञांची मते मागवून पुढची दिशा ठरणार आहे.
राज्यात ‘विद्यापीठ परीक्षा मंडळ’!
By admin | Updated: January 8, 2015 01:39 IST