मोदींच्या वाराणसीत प्रदूषण वाढलं; देवालाही मास्क लावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 15:19 IST2019-11-07T15:10:06+5:302019-11-07T15:19:32+5:30
वाराणसीतही मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे.

मोदींच्या वाराणसीत प्रदूषण वाढलं; देवालाही मास्क लावलं
वाराणसी - दिल्लीतील प्रदूषणात वाढ झाल्याने हवेची गुणवत्ता ही खालावली आहे. दिवाळीत फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली असून श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे. असं असतानाच उत्तर भारताला वायू प्रदूषणाने विळखा घातला आहे. वाराणसीतही मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आता चक्क देवाच्या मूर्तीलाच मास्क घातल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एका मंदिरात शंकराच्या पिंडीला मास्क लावण्यात आले आहे. तसेच मंदिरातील पुजाऱ्यांनीही मास्क घातले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील तारकेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाला मास्क घालण्यात आले आहे. 'शहरातील हवा प्रदूषित झाली आहे. 'भोले बाबा' यांचं या विषारी हवेपासून रक्षण व्हावं यासाठी त्यांना मास्क लावण्यात आलं आहे. ते सुरक्षित राहिले तर आपण सुरक्षित राहू असा आमचा विश्वास आहे' अशी माहिती मंदिरातील पुजाऱ्यांनी दिली आहे.
The 'Shivling' at the Tarkeshwar Mahadev Temple in Varanasi is covered with a mask. Devotees say,"the air is polluted in the city & to save 'Bhole Baba' from this poisonous air we have put on the mask. We believe if he is safe, we will remain safe." pic.twitter.com/gNPcj0ETZO
— ANI UP (@ANINewsUP) November 7, 2019
वाढत्या प्रदूषणाचा फटका हा गंगा नदीच्या आसपासच्या प्रदेशाला बसला आहे. गंगा नदीच्या आसपास राहणाऱ्या भारतीयांचे आयुष्य सात वर्षांनी घटले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने केलेल्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. रिसर्चमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील गंगेच्या पठारावरील प्रदूषण हे उर्वरित देशातील प्रदूषणापेक्षा तिप्पट आहे. 1998 ते 2016 दरम्यान गंगेच्या आसपासच्या परिसरातील वायू प्रदूषणात तब्बल 72 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने या भागातील प्रदूषणाचा अभ्यास केला आहे. यामध्ये गंगा नदीच्या आसपास राहणाऱ्या भारतीयांचे आयुष्य सात वर्षांनी घटले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
गंगा स्वच्छता मोहिम सुरू असतानाच प्रदूषणाची पातळी वाढणं ही चिंतेची बाब आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 40 टक्क्यांहून अधिक जनता या परिसरात राहते. यामध्ये बिहार, चंदिगड, दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होतो. 2016 पर्यंत या प्रदेशातील प्रदूषणात 72 टक्के वाढ झाली आणि त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांचे आयुष्य 3.4 ते 7.1 वर्षांनी घटले आहे. मात्र राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत ठरवेले लक्ष्य गाठण्यात भारत यशस्वी झाल्यास तसेच स्थायी स्वरूपात 25 टक्के प्रदूषण कमी करण्यातही यश आल्यास हवेचा दर्जा सुधारेल. याचा परिणाम म्हणून भारतीयांचे सरासरी आयुष्य 1.3 वर्षांनी वाढेल असंही रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे.