Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : यूपीतील भाजपाच्या विजयाचे श्रेय कोणाला जाते? स्मृती इराणींनी दिलं 'हे' उत्तर..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 17:20 IST2022-03-10T17:19:36+5:302022-03-10T17:20:40+5:30
Smriti Irani : यूपीची ही निवडणूक भाजपाने विकास आणि विकासाच्या मुद्द्यांवर लढवली. आज केवळ भाजपाच नव्हे तर विकासाचा विजय होत आहे, असे स्मृती इराणी यांनी सांगितले.

Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : यूपीतील भाजपाच्या विजयाचे श्रेय कोणाला जाते? स्मृती इराणींनी दिलं 'हे' उत्तर..
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊ लागले आहेत. जसजशी मतमोजणी पुढे सरकत आहे, तसतसा कल अधिकच रंजक होत आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये निवडणुकीतील ईव्हीएमच्या मोजणीनंतर भाजपा आघाडीवर आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपाचे सरकार येणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ या दोघांना दिले आहे.
एका वृत्तवाहिनीने स्मृती इराणींना प्रश्न विचारला की 2017 मध्ये यूपीमधील विधानसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढली होती, परंतु यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील निवडणूक प्रचारात पुढे आहेत, मग तुम्ही कोणाला जास्त श्रेय देणार? यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, "आपल्या सर्वांसाठी परिवाराचे प्रमुख नरेंद्र मोदीजी आहेत. या बाबतीत योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी यांच्यात मतभेद ठेवणार नाही. उत्तर प्रदेशात यशस्वी नेतृत्व देणाऱ्या योगीजींच्या सरकारचाच चमत्कार आहे की आज पुन्हा भाजपाचे सरकार स्थापन होत आहे."
व्होट बँकेच्या राजकारणातून बाहेर पडून विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करा, असे नरेंद्र मोदी यांनी जनतेला सांगितले होते. त्यामुळेच आज मी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला श्रेय देते, असे स्मृती इराणी म्हणाल्या. याचबरोबर, यूपीचे निकाल हे पुरावे आहेत की भाजपला विशेषतः महिलांचा आशीर्वाद मिळाला आहे. एक स्त्री असणे ही माझ्यासाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. यूपीची ही निवडणूक भाजपाने विकास आणि विकासाच्या मुद्द्यांवर लढवली. आज केवळ भाजपाच नव्हे तर विकासाचा विजय होत आहे, असे स्मृती इराणी यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहर मतदारसंघातून आघाडीवर आहेत तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सिरथूमधून पिछाडीवर आहेत. सपा अध्यक्ष अखिलेश यादव करहल विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री श्रीकांत शर्मा हे मथुरेतून आघाडीवर आहेत. तर निवडणुकीपूर्वी भाजपातून सपामध्ये गेलेले स्वामी प्रसाद मौर्य फाजिलनगरमधून 21 हजार मतांनी पराभूत झाले आहेत.