मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:12 IST2025-12-04T18:09:12+5:302025-12-04T18:12:37+5:30
Nitin Gadkari News: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची माहिती दिली.

मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
Nitin Gadkari News: दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. एसआयआर, संचार साथी अॅप, नवीन कामगार कायदे यासह अन्य मुद्द्यांवरून विरोधक संसद परिसरात निदर्शने करत असून, सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका करत आहे. तसेच काही निर्णय मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात महाविकास आघाडीच्या खासदारांनी मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न उपस्थित केला. याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची माहिती दिली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. हा रस्ता २००९ मध्ये सुरू झाला. मागच्या सरकारच्या काळात रस्त्याचे काम सुरू झाले. अनेक कंत्राटदार बदलले गेले. जमीन अधिग्रहणाची समस्या होती. पण आत्तापर्यंत ८९.२९ टक्केकाम पूर्ण झाले आहे. एप्रिल २०२६ च्या आत हा रस्ता पूर्ण केला जाईल. यात कोणतीही दिरंगाई होणार नाही, अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे-कोल्हापूर महामार्गाबाबत प्रश्न विचारला.
वर्षभराच्या आत हे काम पूर्ण केले जाईल
सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, पुणे ते सातारा या रस्त्याचे काम रिलायन्सकडे होते. आता ते रद्द करून या कामाचा पुन्हा आमचा विभाग आढावा घेत आहे. पुण्यातील बायपासच्या सर्व्हिस लेनचे काम विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. खंबाटकी घाटातल्या नव्या दोन बोगद्यांपैकी एक बोगदा लवकरच सुरू करण्यात येईल. साताऱ्याच्या पुढे कोल्हापूरपर्यंतच्या कामात काही अडचणी आहेत. त्यावर माझी पुढील आठवड्यात बैठक आहे. वर्षभराच्या आत हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
दरम्यान, काँग्रेसच्या धुळ्यातील खासदार शोभा बच्छाव यांनी धुळे-पिंपळगाव मार्गाचा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, हा प्रकल्प २०१० ला बीओटीमध्ये पूर्ण झाला. पहिले नुतनीकरण २०१६ साली एक वर्षं उशीराने झाले. त्यावर कंत्राटदाराला १६ कोटी दंड आकारण्यात आला. दुसरे नुतनीकरण २०२१ साली पुन्हा एक वर्षं उशीराने झाले. त्यावर ७ कोटी दंड आकारण्यात आला. तिसरे नुतनीकरण सध्या सुरू आहे. जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. शेवटची मुदत एप्रिल २०२६ आहे. आता धुळे ते पिंपळगाव चौपदरी रस्ता असून तो सहा पदरी करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. लवकरच त्याचे कंत्राट काढून काम सुरू केले जाईल, असे गडकरी यांनी सांगितले.