कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी धार चढवली. तृणमूल काँग्रेसच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात हे राज्य घुसखोरी, तुष्टीकरण आणि सीमा असुरक्षिततेचे मुख्य केंद्र बनले, असा गंभीर आरोप शाह यांनी केला.
कोलकाता येथे ममता बॅनर्जी सरकारविरोधात 'आरोपपत्र' प्रसिद्ध करताना शाह बोलत होते. ते म्हणाले, "बंगालची निवडणूक केवळ राज्यासाठी नाही, तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेसाठी आहे. महत्त्वाची आसाममधील भाजप सरकारने घुसखोरीचे मार्ग बंद केले आहेत, मात्र पश्चिम बंगाल हे आता घुसखोरांसाठी एकमेव प्रवेशद्वार बनले आहे."
"केवळ व्होट बँक तयार करण्यासाठी तृणमूलने घुसखोरीला खतपाणी घातले. सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने वारंवार विनंती करूनही राज्य सरकारने कुंपण घालण्यासाठी जमीन दिली नाही. हा सर्व प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असून, देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे."
तृणमूलचेही 'आरोपपत्र'
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आरोपपत्रास तृणमूल काँग्रेसने काही तासांतच प्रत्युत्तर देत भाजपविरोधात 'प्रति-आरोपपत्र' प्रसिद्ध केले. एक पुस्तिकाही त्यांनी प्रसिद्ध केली.
भाजप केवळ ध्रुवीकरणाचे राजकारण करत असून, आपल्या अपयशाची जबाबदारी झटकत असल्याचा ठपका तृणमूलने यात ठेवला. खासदार महुआ मोड्या व शिक्षणमंत्री ब्रात्य बसू यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत शाह यांच्या 'आरोपपत्रा'चा खरपूस समाचार घेतला.
पुरवणी मतदार यादी प्रसिद्ध
दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी रात्री दुसरी पुरवणी मतदार यादी प्रसिद्ध केली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही यादी पाहताना मतदारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. या यादीत किती नावे वगळली किंवा समाविष्ट केली, याबाबत आयोगाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळातून टीका होत आहे.
काँग्रेसमध्ये अपमान झाला म्हणून केला भाजपत प्रवेश
गुवाहाटी: "काँग्रेसमध्ये मला जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्यात आले. संसदेत बोलण्याची संधी नाकारण्यापासून ते माझ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याकडे कानाडोळा करण्यापर्यंत माझा छळ झाला. अशा अपमानास्पद वातावरणात राहण्यापेक्षा मी सन्मानासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे," अशा स्पष्ट शब्दांत आसामचे ज्येष्ठ नेते प्रद्युत बोर्डोलोई यांनी आपली व्यथा मांडली. पाच दशके काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले बोडॉलोई आता दिसपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचे वाभाडे काढले. शशी थरूर यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याने पक्षातील 'दुसऱ्या फळीतील' नेत्यांनी आपल्याला पद्धतशीरपणे बाजूला सारल्याचा आरोप त्यांनी केला.
Web Summary : Amit Shah accuses TMC of prioritizing vote banks over national security by enabling infiltration in West Bengal. TMC retorted with counter-allegations, accusing BJP of divisive politics. Assam Congress leader Pradyut Bordoloi joins BJP citing neglect.
Web Summary : अमित शाह ने तृणमूल पर बंगाल में घुसपैठ को बढ़ावा देने का आरोप लगाया, वोट बैंक को राष्ट्रीय सुरक्षा से ऊपर रखने का आरोप लगाया। तृणमूल ने पलटवार करते हुए बीजेपी पर विभाजनकारी राजनीति का आरोप लगाया। असम कांग्रेस नेता प्रद्युत बोर्डोलोई बीजेपी में शामिल।