उमर खालिद, शरजिल इमामचा मुक्कम तुरुंगातच, सर्वोच्च न्यायालायने 'असं' कारण देत जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:43 IST2026-01-05T13:42:57+5:302026-01-05T13:43:59+5:30
Supreme Court News: राजधानी दिल्लीमध्ये २०२० मध्ये झालेल्या दंग्यात कथित सहभाग असल्याच्या आरोपावरून गेल्या ५ वर्षांपासून तुरुंगात असलेले विद्यार्थी नेते उमर खालिद आणि शरजील इमाम यांना आज सर्वोच्च न्यायालयात मोठा धक्का बसला आहे.

उमर खालिद, शरजिल इमामचा मुक्कम तुरुंगातच, सर्वोच्च न्यायालायने 'असं' कारण देत जामीन अर्ज फेटाळला
राजधानी दिल्लीमध्ये २०२० मध्ये झालेल्या दंग्यात कथित सहभाग असल्याच्या आरोपावरून गेल्या ५ वर्षांपासून तुरुंगात असलेले विद्यार्थी नेते उमर खालिद आणि शरजील इमाम यांना आज सर्वोच्च न्यायालयात मोठा धक्का बसला आहे. या दोघांविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याचं निरीक्षण नोंदवर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला आहे. तर या प्रकरणातील इतर पाच आरोपांनी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
सध्या तुरुंगात असलेल्या उमर खालिद आणि शरजिल इमामच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सुनावणीस सुरुवात होण्यापूर्वीच पाच वर्षांहून अधिक काळ आरोपींना तुरुंगात ठेवण्यात आल्याच्या मुद्द्याला आधार बनवत बचाव पक्षाने उमर खालिद आणि शरजिल इमाम यांना जामीन देण्याची मागणी केली. मात्र राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेवर विचार करणे या बाबी आरोपींना दीर्घकाळापासून तुरुंगात ठेवण्याच्या मुद्द्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.
तसेच सुनावणीस उशीर झाल्याचा मुद्दा अधोरेखित करून जामीन मागता येणार नाही. तसेच एखाद्या खटल्यात प्रत्येक आरोपीच्या भूमिकेचं वेगवेगळं मूल्यांकन करणं आवश्यक आहे. सर्व आरोपींना एकच निकष लावणे न्यायसंगत ठरणार नाही. एखाद्या खटल्यात काही आरोपींची केंद्रीय भूमिका असते. तर काहींची भूमिका केवळ मदत करण्यापुरती असते. या दोघांमध्ये फरक केल्याशिवाय निर्णय देणे हे मनमानी केल्यासारखे होईल. प्रस्तुत खटल्यामध्ये उमर खालिद आणि शरजिल इमाम यांची भूमिका इतर आरोपींपेक्षा वेगली आणि अधिक गंभीर असल्याचे दिसत आहे, असं निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं.