उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीमधून परतत असलेल्या दुचाकीस्वार विद्यार्थ्यांवर कारमधून आलेल्या तरुणांनी हल्ला केला. या तरुणांनी विद्यार्थ्यांना केवळ मारहाणच केली नाही तर त्यांच्यावर गोळीबारही केला. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सहारनपूर येथील बेहट परिसरात ग्लोबर युनिव्हर्सिटीमधील कुणाल, गौरव आणि दिग्विजय या विद्यार्थ्यांवर हल्ला झाला. ही संपूर्ण घटना सोमवारी दिल्ली-यमुनोत्री महामार्गावरील मिर्झापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुशालपूरजवळ घडली. बीएससी अॅग्रीकल्चरचा विद्यार्थी असलेला कुणाल हा त्याच्या मित्रांसोबत घरी परतत होता. तेव्हा एका नंबरप्लेट नसलेल्या क्रेटा कारने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यानंतर कारमधून प्रवास करत असलेल्या विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर हे विद्यार्थी जेव्हा पळू लागले तेव्हा त्यांनी त्यांच्यावर गोळीबारही केला.
या विद्यार्थ्यांनी कसाबसा आपला जीव वाचवला आणि पोलिसांना हल्ल्याची माहिती दिली. हल्ल्याची माहिती मिळताच मिर्झापूर पोलीस ठाण्यातील प्रभारी आणि पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. जखमी विद्यार्थी कुणाल याला त्वरित बेहट सीएचसीमध्ये भरती करण्यात आलं आहे. येथून प्राथमिक उपचारांसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य विचारात घेऊन त्वरित कारवाई सुरू केली आहे.