"दोन्ही ट्रेनचं एक सारखंच नाव..."; दिल्ली पोलिसांनी सांगितलं स्टेशनवर चेंगराचेंगरी कशी झाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:14 IST2025-02-16T16:13:55+5:302025-02-16T16:14:57+5:30
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी आता महत्त्वाची माहिती दिली आहे.

"दोन्ही ट्रेनचं एक सारखंच नाव..."; दिल्ली पोलिसांनी सांगितलं स्टेशनवर चेंगराचेंगरी कशी झाली?
नवी दिल्लीरेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी आता महत्त्वाची माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोन ट्रेनच्या एक सारख्याच नावामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे की "प्रयागराज" नावाच्या दोन ट्रेन होत्या. एक प्रयागराज एक्सप्रेस आणि दुसरी प्रयागराज स्पेशल.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराज स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर येण्याच्या घोषणेमुळे गोंधळ निर्माण झाला कारण प्रयागराज एक्सप्रेस आधीच प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर उभी होती. ज्यांना त्यांच्या ट्रेनसाठी प्लॅटफॉर्म १४ वर पोहोचता आले नाही त्यांना वाटलं की त्यांची ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर येत आहे, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. मात्र या दोन वेगवेगळ्या ट्रेन होत्या. प्रयागराजकडे जाणाऱ्या चार ट्रेन होत्या, त्यापैकी तीन ट्रेन उशिराने धावत होत्या. त्यामुळे स्टेशनवर खूपच गर्दी झाली.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. अपघातानंतर, रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) आयजीसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर पोहोचून घटनेची संपूर्ण माहिती घेतली. अधिकाऱ्यांनी चेंगराचेंगरी झालेल्या ठिकाणीची पाहणी केली आणि यामागील कारणांचा शोध घेत आहेत.
शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. चेंगराचेंगरी होण्यापूर्वी नेमकं काय घडलं हे शोधण्यासाठी दिल्ली पोलीस सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करत आहेत.