गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:02 IST2025-11-18T12:02:15+5:302025-11-18T12:02:39+5:30
तेलंगणातील शमशाबादमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.

AI फोटो
तेलंगणातील शमशाबादमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. शमशाबाद परिसरातील एक गर्भवती जुळ्या मुलांना जन्म देणार होती. मात्र दोन्ही बाळांचा गर्भाशयात मृत्यू झाला, त्यानंतर उपचारादरम्यान आईचाही मृत्यू झाला. यामुळे दुःखी झालेल्या पतीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंब खूप आनंदी होतं आणि आपल्या जुळ्या मुलांची आतुरतेने वाट पाहत होतं. मुलांच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी घर सजवण्यात आलं होतं, मुलांसाठी नवीन कपडे आणि खेळणी खरेदी करण्यात आली होती. जेव्हा महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या तेव्हा तिला उपचारासाठी ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी दोन्ही मुलांचा गर्भाशयातच मृत्यू झाल्याचं सांगितलं.
या घटनेने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. यानंतर महिलेची प्रकृती देखील आणखी बिघडली आणि तिला उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. अनेक दिवस उपचार करूनही तिला वाचवता आले नाही आणि तिचाही मृत्यू झाला. पत्नी आणि मुलांच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने पतीने आत्महत्या करून स्वत:ला संपवलं
स्थानिकांनी सांगितलं की पती-पत्नीचे नाते खूप चांगलं होतं आणि ते एकमेकांची खूप काळजी घेत होते. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, ते भविष्यासाठी अनेक प्लॅन करत होते, परंतु आता या घटनेने त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.