विमानाने प्रवास करताय? सावधान! ५० टक्के विमानांमध्ये तांत्रिक बिघाड; संसदीय समितीचा धक्कादायक अन् भयभीत करणारा अहवाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 15:14 IST2026-03-27T15:12:33+5:302026-03-27T15:14:44+5:30
या अहवालानुसार, तांत्रिक बिघाड असलेल्या विमानांच्या यादीत इंडिगो एअरलाईन्स आघाडीवर आहे...

विमानाने प्रवास करताय? सावधान! ५० टक्के विमानांमध्ये तांत्रिक बिघाड; संसदीय समितीचा धक्कादायक अन् भयभीत करणारा अहवाल!
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. संसदीय समितीने सादर केलेल्या एक ताज्या अहवालानुसार, तब्बल ५० टक्के व्यावसायिक विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे उघड झाले आहे. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये ७५४ विमानांपैकी तब्बल ३७७ विमानांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड आढळल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांत सर्वाधिक बिघाड -
या अहवालानुसार, तांत्रिक बिघाड असलेल्या विमानांच्या यादीत इंडिगो एअरलाईन्स आघाडीवर आहे. इंडिगोच्या ४०५ विमानांच्या ऑडिटमध्ये १४८ विमानांत तांत्रिक बिघाड आढळून आला आहे. याशिवाय, एअर इंडियाची स्थितीही अत्यंत गंभीर आहे, त्यांच्या १६६ पैकी १३७ विमानांमध्ये वारंवार तांत्रिक समस्या आढळून आली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या १०१ पैकी ५४ विमानांमध्येही दोष आढळले आहेत.
अहवालात बोईंग ७८७ आणि ७७७ विमानांच्या वैमानिकांच्या प्रशिक्षणातील उणिवांवरही बोट ठेवण्यात आले आहे. तसेच, अनेक आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये अपुरे केबिन क्रू आणि 'फ्लाइट ड्युटी टाईम'च्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. एअर इंडियाला सुरक्षा नियमांच्या उल्लंघनासाठी डीजीसीएने ९ कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. २०२५ च्या अखेरपर्यंत विविध एअरलाईन्सना एकूण १९ नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. यामध्ये कॉकपिटमध्ये अनधिकृत प्रवेश आणि कालबाह्य आपत्कालीन उपकरणांचा वापर यांसारख्या गंभीर बाबींचा समावेश आहे.
डीजीसीएची यंत्रणाही खिळखिळी
विमान वाहतूक क्षेत्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या डीजीसीए (DGCA) मध्ये ४८.३ टक्के पदे रिक्त असल्याचे अहवालात म्हटले आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे वाढत्या विमान वाहतुकीवर देखरेख ठेवणे कठीण होत असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने सुधारणा करण्याची आणि देखरेख यंत्रणा अधिक कडक करण्याची शिफारस समितीने केली आहे.