Railway Accident: 'रील'चे वेड जीवावर बेतले; रेल्वेच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 14:06 IST2025-10-23T14:05:25+5:302025-10-23T14:06:45+5:30
Odisha Puri Railway Accident: ओडिशातील पुरी येथून धक्कादायक माहिती समोर आली.

Railway Accident: 'रील'चे वेड जीवावर बेतले; रेल्वेच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
ओडिशातील पुरी येथून धक्कादायक माहिती समोर आली. जनकदेईपूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर रील बनवत असताना पाठीमागून वेगाने आलेल्या ट्रेनने एका १५ वर्षाच्या मुलाला जोरदार धडक दिली. या धडकेत मुलाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वजीत साहू असे मृत मुलाचे नाव असून तो मंगलाघाट येथील रहिवासी होता. विश्वजीत साहू हा त्याच्या काही मित्रांसोबत सखीगोपालमधील बिरगबिंदापूर गावात गेला, जिथे त्यांनी दक्षिणकाली मंदिरात पूजा केली. परत येताना त्यांनी बिरप्रतापपूरमधील कामरूप मंदिराचेही दर्शन घेतले. त्यानंतर ते जनकदेईपूर रेल्वे ट्रॅकजवळ थांबले आणि रील बनवू लागले. रील बनवण्याच्या नादात विश्वजीतला जवळून येणाऱ्या ट्रेनची जाणीव झाली नाही. तो रेल्वे रुळाजवळ उभा राहून रील बनवत असताना, त्याला वेगाने आलेल्या ट्रेनने धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, विश्वजीत लांब फेकला गेला. यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्याने हालचाल केली नाही. स्थानिक लोकांनी तात्काळ धाव घेऊन त्याला पुरी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विश्वजीतचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला.
लाईक्स आणि व्ह्यूजसाठी जीव धोक्यात
सोशल मीडियावरील लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याच्या नादात तरुण आणि किशोरवयीन मुले आपला जीव धोक्यात घालत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. रील बनवण्याच्या वेडापायी झालेल्या या दुर्दैवी अपघाताने पुन्हा एकदा अशा धोकादायक प्रवृत्तीवर आणि निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले. पालकांनी तसेच प्रशासनाने या वाढत्या धोक्याबद्दल तरुणांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.