काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 07:54 IST2026-01-14T07:53:53+5:302026-01-14T07:54:03+5:30
कोलकात्यामधील चालक देशात सर्वाधिक हॉर्न वाजवतात, तर बंगळुरूमध्ये चालक वारंवार अचानक ब्रेक लावतात.

काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे
नवी दिल्ली: भारतीय रस्त्यांवर इलेक्ट्रिक दुचाकी चालवणाऱ्यांच्या सवयींबाबत एक रंजक माहिती समोर आली आहे. एथर एनर्जीच्या २०२५च्या 'रायडिंग इनसाइट्स' अहवालानुसार, पुणे व हैदराबादमधील चालक अत्यंत शांतपणे गाडी चालवतात. या शहरांमध्ये हॉर्न वाजवण्याचे प्रमाण कमी असून, तिथली वाहतूक अधिक शिस्तबद्ध आहे. कोलकात्यामधील चालक देशात सर्वाधिक हॉर्न वाजवतात, तर बंगळुरूमध्ये चालक वारंवार अचानक ब्रेक लावतात.
सॉफ्टवेअर आता वाहतुकीचा अविभाज्य भाग
एथर एनर्जीचा हा अहवाल देशभरातील वायरलेस नेटवर्कशी जोडलेल्या ५ लाखांहून अधिक एथर इलेक्ट्रिक स्कूटर्सकडून मिळालेल्या डेटावर आधारित आहे.
एथरचे मुख्य व्यवसाय अधिकारी रवनीत फोकेला यांनी सांगितले की, 'सॉफ्टवेअर आता वाहतुकीचा अविभाज्य भाग बनत आहे.'
अहवालातील महत्त्वाचे निष्कर्ष कोणते?
हॉर्न वाजवण्यात कोलकाता आघाडीवर : आकडेवारीनुसार, कोलकातामध्ये सरासरी तासाला १३१ वेळा हॉर्न वाजवला जातो. हे प्रमाण देशात सर्वाधिक असून, तिथल्या आक्रमक वाहतुकीचे आणि ध्वनिप्रदूषणाचे निदर्शक आहे.
शांत शहरे : याउलट पुणे व हैदराबादमधील चालक अत्यंत शांतपणे गाडी चालवतात. या शहरांमध्ये हॉर्न वाजवण्याचे प्रमाण कमी असून, तिथली वाहतूक अधिक शिस्तबद्ध असल्याचे दिसून आले.
सुरक्षा प्रणालीचा वापर : एथरच्या 'फॉलसेफ' (स्कूटर पडल्यास इंजिन आपोआप बंद होणे) या सुविधेचा वापर दिल्ली व हैदराबादमध्ये सर्वाधिक झाला, तर मुंबई व बंगळुरूमध्ये हा वापर कमी होता. रहदारीच्या शहरांत 'लाइव्ह लोकेशन शेअरिंग'चा कल वाढला आहे. आग्रा, कोटा व दिल्लीत चालकांनी अधिक वेळा लोकेशन शेअर केले.