‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:44 IST2025-12-19T15:41:53+5:302025-12-19T15:44:01+5:30
Farmer Demands Helicopter In Madhya Pradesh: भारत हा अजूनही कृषिप्रधान देश मानला जात असला तरी इथे शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मध्य प्रदेशमधील उज्जैन येथून एका शेतकऱ्याची अशीच व्यथा समोर आली आहे.

‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
भारत हा अजूनही कृषिप्रधान देश मानला जात असला तरी इथे शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मध्य प्रदेशमधील उज्जैन येथून एका शेतकऱ्याची अशीच व्यथा समोर आली आहे. प्रशासकीय व्यवस्थेच्या अनास्थेमुळे त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याने शेतात जाण्यासाठीचा रस्ताच हिरावून घेण्यात आल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतात जाण्यासाठी आपल्याला हेलिकॉप्टर पुरवण्यात यावं, अशी मागणी केली आहे.
हे संपूर्ण प्कररण घट्टिया तालुक्यामधील उटेसरा गावातील आहे. येथील शेतकरी मानसिंग राजोरिया यांच्याकडे ३.५ बीघा जमीन आहे. तसेच याच जमिनीवर शेती करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. मात्र २०२३ साली उज्जैन गरोठ महामार्गाच्या बांधणीला सुरुवात झाली आणि सोबतच या शेतकऱ्याचं जीवन संकटात सापडलं. महामार्गाच्या बांधणीदरम्यान, शेताकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाले. तसेच शेतासमोर सुमारे २ मीटर उंच महामार्ग उभा राहिला, मात्र शेतात जाण्यासाठी अंडरपास किंवा पर्यायी रस्ता बांधण्यात आला नाही.
मानसिंग यांनी सांगितले की, ‘’आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ह्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्याला लागून आहेत. मात्र माझी शेतजमीन मध्येच अडकली आहे. त्यामुळे या शेतात ट्रॅक्टर, बैलगाडी जाऊ शकत नाही, एवढंच नाही तर शेतामध्ये चालतही जाता येत नाही. शेत समोर दिसतं पण तिथे जाऊ शकत नाही. त्यामुळे माझी संपूर्ण शेती वापराविना पडून आहे’’.
या शेतकऱ्याने तहसीलदार, एसडीएम आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत फेऱ्या मारल्या. मुख्यमंत्री हेल्पलाईनपर्यंत तक्रार केली. मात्र वारंवार केवळ आश्वासनेच मिळाली. तसेच कुठेही तोडगा निघाला नाही. ‘’अर्ज-विनंत्या करून मी थकून गेलो आहे. आता अर्ज देण्यापुरतीही ताकद उरलेली नाही. शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवून चपला झरून गेल्या आहे आहे. त्यामुळे आता शेतात जाण्यासाठी एका हेलिकॉप्टरची मागणी करत आहे. असे या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. एवढंच नाही तर शेतात जाण्यासाटी रस्ता मिळाला नाही तर कुटुंबीयांचं पालन पोषण करण्यासाठी माझ्यासमोर कुठलाही मार्ग उरणार नाही. तसेच नाईलाजास्तव विषप्राशन करण्याचा पर्याय माझ्यासमोर असेल, असा इशाराही त्याने दिला.
दरम्यान, शेतकऱ्याच्या या मागणीबाबत घट्टीया तालुक्यातील एसडीएम राजाराम कजगरे यांनी सांगितले की, आम्हाला या शेतकऱ्याचा अर्ज मिळाला आहे. शेतापर्यंत जाणारा मुख्य रस्ता बांधून द्यावा ही त्यांची मुख्य मागणी आहे. त्यांनी याबाबत आधी दिलेलं निवेदनही विचाराधीन आहे. तसेच या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन तपास केला जात आहे. तसेच या प्रश्नाची लवकरच सोडवणूक करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.