'इराणची तीन जहाजे हिंद महासागरात होती, एका जहाजाला भारताने...', परराष्ट्र मंत्र्यांनी राज्यसभेत दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:54 IST2026-03-09T12:47:07+5:302026-03-09T12:54:20+5:30
हिंद महासागरात इराणच्या एका युद्धनौकेवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याबद्दल भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत माहिती दिली.

'इराणची तीन जहाजे हिंद महासागरात होती, एका जहाजाला भारताने...', परराष्ट्र मंत्र्यांनी राज्यसभेत दिली माहिती
इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्य पूर्वेत संघर्ष सुरू असतानाच इराणची हिंद महासागरात असलेल्या एका युद्धनौकेवर हल्ला करण्यात आला. या घटनेबद्दल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत माहिती दिली. 'हिंद महासागरात इराणची तीन जहाजे होती, त्यापैकी एका जहाजाला भारताने आश्रय दिला होता', असे जयशंकर यांनी सांगितले.
एस. जयशंकर राज्यसभेत बोलताना म्हणाले की, "मी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी २८ फेब्रुवारी आणि पाच मार्च रोजी बोललो आहे. इराणची तीन जहाजे हिंद महासागरात होती. भारताने इराणच्या विनंतीनुसार, एका जहाजाला डॉकिंग करण्यास परवानगी दिली आणि आश्रय दिला होता. त्यासाठी इराणने भारताचे आभार मानले आहेत."
"भारताच्या ऊर्जा पुरवठ्याबद्दल आम्ही सावध आहोत. भारताचे जहाजांवरील दोन नाविक गमावले आहेत. त्यापैकी एक अजूनही बेपत्ता आहे", अशी माहिती जयशंकर यांनी सभागृहाला दिली. ओमानच्या खाडीमध्ये एका तेलवाहू जहाजावर हवाई हल्ला केला गेला. यात दोन भारतीय नाविकांचा मृत्यू झाला आहे. कॅप्टन आशीष कुमार (बिहार) आणि क्रू मेंबर दलीप सिंह (राजस्थान) अशी त्यांची नावे आहेत.
तेहरानमध्ये भारतीय दूतावास काम करतोय
एस. जयशंकर म्हणाले की, "भारतीय दूतावासाने तेहरानमध्ये अनेक भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर हलवले आहे. इराणमध्ये व्यवसायानिमित्ताने भारतीय नागरिकांनाही आर्मेनिया पार करून भारतात परतण्यासाठी मदत करण्यात आली. तेहरानमध्ये भारतीय दूतावास पूर्ण क्षमतेने सुरू आहे. भारतीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
"भारत सरकारने २० फेब्रुवारी २०२६ रोजी एक निवेदन जारी केले होते आणि गंभीर चिंता व्यक्त केली होती. सर्वांनाच संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. तणाव कमी करण्यासाठी संवाद ठेवला गेला पाहिजे. नव्या घडामोडींवर पंतप्रधानही जवळून नजर ठेवून आहेत", असेही जयशंकर यांनी सांगितले.