पंजाबमधील तीन तरुणांचं इराणमधूनअपहरण करून आता त्यांच्या सुटकेच्या बदल्यात अपहरणकर्त्यांकडून लाखो रुपयांची खंडणी मागितली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपहरण झालेले तीन तरुण हे पंजाबमधील संगरूर, एसबीएस नगर आणि होशियारपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या तरुणांना दिल्लीमधून वर्क परमिटच्या आधारावर ऑस्ट्रेलियात पाठवण्याचं आमिष दाखवून प्रत्यक्षात इराणमध्ये पाठवण्यात आले होते.
याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार १ मे पासून या तरुणांशी कुटुंबीयांचा कुठलाही संपर्क प्रस्थापित झालेला नाही. आता ११ दिवस लोटले आहेत. दरम्यान, या तरुणांचं अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांचा व्हिडीओ कॉल आला असून, या व्हिडीओ कॉलमध्ये सदर तरुण हे दोरीने बांधलेल्या स्थितीत दिसत आहेत. तसेच त्यांच्या शरीरावर जखणा दिसत आहेत. अपहरणकर्ते कधी ५५ लाख तर कधी १ कोटी रुपयांची मागणी करत आहेत. तर या तरुणांना परदेशात पाठवणारा एजंट फरार आहे.
अपहृत तरुणांपैकी एकाची आई बलविंदर कोर यांनी त्यांच्या मुलाच्या सुटकेसाठी सरकारकडे विनवणी केली आहे. तिने सांगितले की, माझ्या मुलाला ऑस्ट्रेलियात पाठवण्याचे आमिष दाखवून फसवण्यात आले. तर शेजारी भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, एक पत्र मिळाल्यानंतर आम्हाला या अपहरणाची माहिती मिळाली. या सर्व तरुणांना सुखरूपपणे भारतात आणावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. दरम्यान, भारतीय दूतावासाने या सर्व तरुणांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची आणि त्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी इराण सरकारकडे केली आहे.