"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:13 IST2025-07-07T15:13:05+5:302025-07-07T15:13:37+5:30
विनोद कुमार आणि त्यांची पत्नी मंजू यांच्या एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू झाला आहे.

फोटो - आजतक
लखनौचे रहिवासी विनोद कुमार आणि त्यांची पत्नी मंजू यांच्या एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. आधी दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता राजस्थानमध्येअपघातात त्यांची तिसरी मुलगी जया शर्माने जीव गमावला आहे. "आता आम्ही कोणासाठी जगू, आधीच दोन मुलांना खांदा दिला आहे. देवा! कसली परीक्षा घेतोयस..." असं विनोद कुमार यांनी म्हटलं आहे.
विनोद कुमार लखनौच्या अमिनाबाद येथे कॉस्मेटिकचं दुकान चालवतात. त्यांना पाच मुलं होती. १७ एप्रिल २०१४ रोजी मोठी मुलगी सोनालीचा अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर २२ ऑगस्ट २०२२ रोजी मुलगा अभिषेकचाही एका अपघातात मृत्यू झाला. आता तिसरी मुलगी जयाचा अपघातात मृत्यू झाल्याने पालक पुन्हा एकदा हादरले. देवा, तू आमच्यापासून तीन मुलांना का हिरावून घेतलंस? असा प्रश्न आता आई विचारत आहे.
शनिवारी रात्री राजस्थानमधील बरण येथे एका वेगवान कारने पिकअपला धडक दिली. या अपघातात लखनौच्या कैसरबाग येथील शिवाजी मार्गावर राहणारा नमन चतुर्वेदी (२५), जया शर्मा, गोरखपूरची अंशिका मिश्रा आणि दिल्लीचा राहुल प्रकाश (३०) यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण रात्री राजस्थानच्या कोटा येथे जात होते. कारचा वेग खूप जास्त होता.
अपघातात कारचा चक्काचूर झाला. यामध्ये नमन, अंशिका आणि राहुलचा मृत्यू झाला होता. जयाची प्रकृती गंभीर होती, उपचारासाठी तिला कोटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.