बंगळूर मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी; ई-मेलमध्ये लिहिलेले कारण ऐकून अधिकारीही चक्रावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:18 IST2025-11-18T14:18:18+5:302025-11-18T14:18:42+5:30
बंगळुरूमध्ये एका व्यक्तीने थेट मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र, या धमकीचे कारण ऐकून मेट्रो अधिकारी आणि पोलीसही चक्रावून गेले आहेत.

बंगळूर मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी; ई-मेलमध्ये लिहिलेले कारण ऐकून अधिकारीही चक्रावले!
बंगळूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला एका व्यक्तीने थेट मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र, या धमकीचे कारण ऐकून मेट्रो अधिकारी आणि पोलीसही चक्रावून गेले आहेत. धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपल्या माजी पत्नीला त्रास देऊ नका, अन्यथा स्फोट घडवला जाईल, अशी चेतावणी दिली आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, ही धमकी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी बंगळूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडलला ई-मेलद्वारे मिळाली. ई-मेलद्वारे धमकी देणाऱ्या या व्यक्तीने अत्यंत विचित्र मागणी केली आहे. त्याने आपल्या ई-मेलमध्ये लिहिले की, "मला जर हे कळले की तुमचे मेट्रो कर्मचारी ड्युटी संपल्यानंतर माझ्या माजी पत्नीला, पद्मिनीला त्रास देत आहात, तर लक्षात ठेवा... तुमच्या एका मेट्रो स्टेशनमध्ये धमाका केला जाईल..." आता या धमकीमुळे बीएमआरसीएलमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या बीएमआरसीएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू
पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे आणि त्याने ज्या ठिकाणाहून हा ई-मेल पाठवला, त्या लोकेशनचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दिल्लीतील बॉम्ब धमक्यांच्या पार्श्वभूमीवर घटना
सध्या दिल्लीत बॉम्ब धमक्यांच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत, त्यामुळे हे प्रकरण देखील पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे. अलीकडेच दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटाचा तपास अजूनही सुरू आहे. या घटनेचे धागेदोरे हरियाणातील फरिदाबाद येथील एका दहशतवादी मॉड्युलशी जोडले गेले होते.
सीआरपीएफ शाळांना धमकी
मंगळवारी सकाळी दिल्लीतील सीआरपीएफच्या दोन शाळांनाही ई-मेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. तथापि, सखोल तपासणीनंतर ही धमकी बनावट असल्याचे स्पष्ट झाले.