'ती' मुले गणितात शाळकरी मुलांपेक्षा हुशार; संशोधनाने वाढवली पालकांची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 10:02 IST2025-02-08T09:56:29+5:302025-02-08T10:02:01+5:30
Education India: संशोधनानुसार, शाळकरी मुले शैक्षणिक गणितात चांगली असतात, तर भाजी मंडईतील मुले अवघड व्यवहार लवकर सोडवितात.

'ती' मुले गणितात शाळकरी मुलांपेक्षा हुशार; संशोधनाने वाढवली पालकांची चिंता
नवी दिल्ली : देशातील अनेक शाळकरी मुलांना साधी वजाबाकी येत नसल्याचे नुकतेच समोर आले होते. त्यातच आता मुलांना शाळेत शिकवले जाणारे गणित आणि दैनंदिन जीवनात वापरले जाणारे गणित यात खूप अंतर असल्याचे समोर आले आहे. भाजी मंडईतील मुले ८०० ग्रॅम बटाटे आणि १.४ किलो कांद्याची किंमत काही सेकंदांत सांगू शकतात. मात्र हीच किंमत सांगण्यासाठी शाळेतील मुले कॅल्क्युलेटरची मदत घेत असल्याची बाब एका संशोधनात समोर आली आहे.
संशोधनानुसार, शाळकरी मुले शैक्षणिक गणितात चांगली असतात, तर भाजी मंडईतील मुले अवघड व्यवहार लवकर सोडवितात. मात्र, ते शालेय गणितात कमकुवत आहेत. नोबेल पारितोषिक विजेते अॅस्थर डुफलो आणि अभिजित बॅनर्जी यांच्या टीमने हे संशोधन केले आहे.
दैनंदिन गणिताची कौशल्ये शाळेत उपयोगी पडू शकतात का आणि शाळेत शिकलेले गणित दैनंदिन जीवनात लागू होते का हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संशोधकांनी दिल्ली आणि कोलकात्याच्या भाजी मंडईतील १,४३६ रमुले आणि ४७१ शाळकरी मुलांचा अभ्यास केला.
शाळेत प्रवेश, पण...
भाजी मंडईत काम करणाऱ्या अनेक मुलांनी शाळांमध्ये प्रवेश घेतला होता, पण त्यांना जास्त शिकता आले नाही. यातील केवळ ३२ टक्के मुलांना तीन अंकी संख्येचा भागाकार करता आला.
अभ्यासात काय आढळले?
अभ्यासात १३ ते १५ वर्षाच्या मुलांचा समावेश करण्यात आला होता. शाळेत जात असलेल्या एक टक्क्यांहून कमी विद्यार्थ्यांना व्यावहारिक प्रश्न सोडविण्यास जमले नाहीत. मात्र एक तृतीयांश मंडईतील मुलांनी हे प्रश्न अगदी सहज सोडविले.
मंडईतील मुले मानसिक शॉर्टकट वापरतात, तर शाळेत जाणारी मुले लिखित गणनेवर अवलंबून असतात. ही तफावत दूर करण्यात भारतातील शिक्षण व्यवस्था अपयशी ठरल्याचे संशोधकांचे मत आहे.