हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 19:17 IST2025-11-14T19:16:43+5:302025-11-14T19:17:55+5:30
भाजपच्या अधिकृत हँडलने 'पुढचा नंबर बंगालचा' असे ट्वीट केले आहे. तर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही एएनआयशी बोलताना, बिहारमधील विजयाचा हवाला देत 'बंगाल वाली दीदी, पुढची वेळ बंगालची आहे,' असे म्हटले होते.

हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजप आणि संपूर्ण एनडीए गोटात अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे. या विजयानंतर भाजप नेत्यांनी आपले लक्ष थेट पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीकडे वळवले आहे. भाजप नेत्यांनी, पुढील वर्षात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरकारला हटवण्याची महत्त्वाकांक्षा उघडपणे बोलून दाखवायला सुरुवात केली आहे. भाजप नेत्यांच्या या विधानांवर टीएमसीनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपच्या अधिकृत हँडलने 'पुढचा नंबर बंगालचा' असे ट्वीट केले आहे. तर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही एएनआयशी बोलताना, बिहारमधील विजयाचा हवाला देत 'बंगाल वाली दीदी, पुढची वेळ बंगालची आहे,' असे म्हटले होते.
भाजपच्या या दाव्यावर टीएमसीने एका बंगाली म्हणीच्या सहाय्याने प्रत्युत्तर दिले, टीएमसी नेते कुणाल घोष यांनी सोशल मीडियावर भाजपच्या पोस्टवर पलटवार करताना 'कौवे के लिए पके बेल का क्या काम?' या म्हणीचा उल्लेख केला. याचा अर्थ, अनुकूल परिस्थितीचा संबंधिताला लाभ होत नसेल, तर ती निरर्थक असते. म्हणजेच, भाजपच्या बिहारमधील विजयाचा बंगालच्या निवडणुकीतील यशाशी कोणताही संबंध नाही.
घोष पुढे म्हणाले, बिहार आणि बंगाल हे राजकीयदृष्ट्या पूर्णपणे भिन्न राज्ये आहेत आणि दोन्ही ठिकाणचे राजकीय चित्र वेगवेगळे आहे. बंगालमध्ये भाजपला लोकांचा विश्वास मिळवण्यात सातत्याने अपयश आले आहे. त्यांनी भाजप नेत्यांना विनंती केली की त्यांनी बंगालची तुलना बिहारशी करू नये. 'SIR आणा किंवा आणखी काही, ते येथे चालणार नाही. एवढेच नाही तर, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी पुढील वर्षी पूर्ण बहुमताने सत्ता कायम राखेल, असा विश्वासही व्यक्त केला.