पोलीस असल्याचे सांगून तरुणींना जाळ्यात अडकवायचा, पण अखेरीस डाव उलटला, प्रेयसीला भेटायला गेला असता असा गेम झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 18:10 IST2025-07-09T18:09:23+5:302025-07-09T18:10:01+5:30
Delhi Crime News: दिल्ली पोलिसांच्या खात्यामध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर असल्याचं सांगून महिला आणि तरुणीना भुलवणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस असल्याचे सांगून तरुणींना जाळ्यात अडकवायचा, पण अखेरीस डाव उलटला, प्रेयसीला भेटायला गेला असता असा गेम झाला
दिल्ली पोलिसांच्या खात्यामध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर असल्याचं सांगून महिला आणि तरुणीना भुलवणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा तरुण सोशल मीडियावरून ओळख झालेल्या एका महिलेला भेटण्यासाठी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. तिथे त्याने पोलिसांच्या वर्दीत रुबाब दाखवत तिलाल इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे त्याला भेटण्यासाठी आलेल्या महिलेने असा काही खेळ केला की, या तरुणाचं पितळ उघडं पडलं आणि पोलिसांनी थेट त्याला ताब्यात घेतलं.
त्याचं झालं असं की, साहिल नावाच्या तरुणाची सोशल मीडियावरून एका तरुणीशी ओळख झाली होती. फोनवर बोलता बोलता या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झाले. तसेच त्यांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं. साहीलसुद्धा अगदी तयार होऊन कथित मैत्रिणीला भेटण्यासाठी आला. मात्र ही कथित प्रेयसी जेव्हा साहिलला भेटण्यासाठी आली तेव्हा तिला साहिलबाबत काही शंका आली.
साहिलने आपण दिल्ली पोलिसांमध्ये सब इन्स्पेक्टर असल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात त्याचे हावभाव पाहिल्यावर सदर तरुणी सावध झाली. बोलता बोलता तिने साहीलकडे ओळखपत्र मागितलं. तसेच ओळखपत्र पाहिल्यावर तिला साहिल हा कुणी तोतया असल्याची खात्री पटली. त्यानंतर तिने हळूच बाजूला जात कुणाला तरी फोन केला. मग काही वेळातच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी साहिलला अटक केली.
खरंतर आपण जिला भेटण्यासाठी आलो आहोत. ती स्वत: दिल्ली पोलीस दलामध्ये अधिकारी आहे, याची त्याला खबरच नव्हती. साहिलला अटक करून पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगमधून दिल्ली पोलिसांची एक डायरी, बनावट नियुक्तीपत्र आणि इतर कागदपत्रे सापडली. तसेच साहील हा पोलीस अधिकारी असल्याचं सांगून तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवयाचा, अशी माहितीही समोर आली.