एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 10:06 IST2025-08-01T10:05:52+5:302025-08-01T10:06:58+5:30
४३ वर्षीय अनादी मिश्रा अल्जेरियातील अन्नाबा शहरातील एका स्पंज आयर्न कंपनीत काम करत होते. १८ जुलै रोजी या आयर्न कंपनीत झालेल्या स्फोटात त्यांचे निधन झाले.

एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन
चांगली कमाई करून आपल्या कुटुंबाला एक चांगलं आयुष्य द्यावं, अशी प्रत्येकाची ईच्छा असते. काही लोक तर यासाठी घरापासून दूर परदेशात जातात. उत्तर प्रदेशातील एका सामान्य कुटुंबातील मुलाने देखील असंच स्वप्न पाहिलं पण, आता त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील भितरगाव ब्लॉकमधील बारी गावातील ४३ वर्षीय अनादी मिश्रा अल्जेरियातील अन्नाबा शहरातील एका स्पंज आयर्न कंपनीत काम करत होते. १८ जुलै रोजी या आयर्न कंपनीत झालेल्या स्फोटात त्यांचे निधन झाले. ते तिथे ऑपरेटर म्हणून काम करत होते. १२ दिवस उलटूनही त्यांचे पार्थिव गावात पोहोचू शकले नाही.
मुलाच्या पार्थिवाची वाट पाहणारे वृद्ध वडील राजेंद्र मिश्रा (६८) यांचे बुधवारी निधन झाले. मुलाच्या मृत्युनंतर आता वडिलांच्या मृत्युने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
१८ जून रोजी अनादी मिश्रा यांनी अल्जेरियाच्या स्पंज आयर्न कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या एका महिन्यानंतर, १७ जुलै रोजी कारखान्यात झालेल्या मोठ्या स्फोटात ते गंभीर जखमी झाले. दुसऱ्या दिवशी १८ जुलै रोजी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. कुटुंबाला ही बातमी कळताच सर्वांना धक्का बसला. अनादी यांचा धाकटा भाऊ अर्पित मिश्रा यांनी सांगितले की, त्यांचे वडील राजेंद्र मिश्रा आधीच कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या बातमीने ते पूर्णपणे खचून गेले होते. त्यांनी खाणे-पिणे बंद केले आणि शेवटपर्यंत मुलाचा मृतदेह येण्याची वाट पाहत राहिले.
१२ दिवसांनंतरही मृतदेह घरी पोहोचला नाही!
१२ दिवसांनंतरही अनादीचा मृतदेह भारतात आणता आला नाही. या प्रतीक्षेने हळूहळू कुटुंबाच्या मनावर आघात होत होते.यातच बुधवारी राजेंद्र मिश्रा यांचेही निधन झाले. आता अनादीची आई कांती मिश्रा, वहिनी सुनीता, बहिणी पूनम, प्रीती, स्वाती आणि पुतण्या विभू आणि रिभू, संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
प्रशासनाकडून प्रतिसाद नाही!
अर्पित म्हणाले की, मृतदेह आणण्यासाठी प्रशासन आणि कंपनीशी वारंवार संपर्क साधला जात आहे, परंतु अद्याप कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. कुटुंबाला आता फक्त एवढंच वाटतंय की अनादीचा मृतदेह लवकरात लवकर गावात पोहोचावा, जेणेकरून त्याचा शेवटचा निरोप सन्मानाने देता येईल. या दुःखद घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे.