कोल्हापूर : लिलावासाठी वाळूच्या ३९ गटांकरिता निविदा प्रसिद्ध करून एकही निविदा न आल्याने जिल्हा प्रशासनाकडून आता फेरनिविदा काढण्यात येणार आहे. दोन दिवसांत निविदेची पुन्हा जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून, मे अखेर पुढील लिलाव होण्याची शक्यता आहे.डिसेंबरपासून एप्रिल महिन्यापर्यंत १४४ वाळू गटांचे लिलाव काढण्यात आले. त्यापैकी ५१ गटांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये १७ डिसेंबर २०१३ ला काढण्यात आलेल्या लिलावामध्ये शिरोळ तालुक्यातील १५, हातकणंगले व पन्हाळा तालुक्यांतील प्रत्येकी १ वाळू गटाला मंजुरी देण्यात आली. २० फेब्रुवारी २०१४मध्ये काढलेल्या लिलावात शिरोळ तालुक्यातील ११, पन्हाळ्यातील ३ व कागलमधील १ गटाला मंजुरी देण्यात आली. ९ एप्रिलच्या लिलावात शिरोळमधील १७ व पन्हाळ्यातील २ गटांना मंजुरी देण्यात आली. आज (सोमवारी) ३९ गटांच्या लिलावासाठी निविदा उघडण्यात येणार होत्या. परंतु एकही निविदा न आल्याने वाळू लिलावाची प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे दोन दिवसांत पुन्हा लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून, मे अखेर हा लिलाव होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)--------------------------------
वाळू लिलावासाठी एकही निविदा नाही - मे अखेर पुन्हा लिलाव निघणार -दोन दिवसांत पुन्हा निविदा प्रसिद्ध होणार
By admin | Updated: May 13, 2014 00:57 IST