"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 09:31 IST2025-11-23T09:30:18+5:302025-11-23T09:31:27+5:30
भारतीय लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी दिल्लीत झालेल्या स्फोटावरून पाकिस्तानचे वाभाडे काढले. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर लष्करप्रमुखांनी हे विधान केले.

"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
"पाकिस्तानला आता कळून चुकलं आहे की, भारताला समोरासमोर युद्ध लढून हरवू शकत नाही. त्यामुळेच तो प्रॉक्सी वॉर करून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे काम करत आहे. दिल्लीत झालेला स्फोट त्याच प्रयत्नांचा भाग होता", असे विधान करत भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेचे वाभाडे काढले.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे नवी दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या पदवीप्रदान सोहळ्यात बोलत होते.
लष्करप्रमुख जनरल द्विवेदी म्हणाले, "पाकिस्तानला आता हे कळून चुकले आहे की, भारतासोबत थेट युद्ध करून हरवू शकत नाही. त्यामुळे तो प्रॉक्सी वॉर आणि खोटी लढाई लढत आहे. याच प्रयत्नातून तो भारतात अस्थिर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे."
"दिल्लीमध्ये झालेला बॉम्बस्फोट अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नांचाच भाग होता. पाकिस्तानला काही करून त्याचं अस्तित्व दाखवायचं आहे. पण, आनंद आहे की, आजचा भारत बदलेला आहे. भारताने हा घातपात आधीच ओळखला आणि वेळीच कारवाई केली. त्यांना भारताच्या कानाकोपऱ्यात बॉम्बस्फोट करायचे होते आणि आपली शहरे, ज्यामध्ये मुंबईही आहे, त्यांच्या निशाण्यावर होती", असे जनरल द्विवेदी म्हणाले.
२२ मिनिटात अड्डे उद्ध्वस्त केले
जनरल द्विवेदी म्हणाले, "ऑपरेशन सिंदूर एक विश्वसनीय मोहीम होती. त्यातील प्रत्येक सदस्याने पूर्ण समन्वय ठेवून आपापली जबाबदारी पार पाडली. याच समन्वयामुळे भारतीय सशस्त्र दलाने २२ मिनिटातच नऊ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केले."
"ऑपरेशन सिंदूर बदलल्या परिस्थितीचे अचूक आकलन करून कारवाई करण्याच्या भारतीय लष्कराच्या क्षमतेचे एक उदाहरण होते. हा काही अचानक घेतलेला निर्णय नव्हता. अनेक वर्षे या गोष्टीचा विचार केल्याचा परिणाम होता. गुप्तचर यंत्रणा, अचूकता आणि तंत्रज्ञान हे सगळे एकत्र आणून कारवाई केली जाऊ शकते", असे द्विवेदी म्हणाले.
लष्करप्रमुख द्विवेदी म्हणाले की, ही लष्करी कारवाई ७ मेच्या पहाटे सुरू झाली होती आणि पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये बनलेले दहशतवादी अड्डे या कारवाईच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्यात आले होते. पाकिस्तानने भारतावर हल्ले केले होते, त्याचे प्रत्युत्तर म्हणूनही ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. दोन अण्वस्त्र सज्ज देशांमध्ये ८८ तास हा संघर्ष सुरू होता.