...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 05:46 IST2025-10-04T05:45:48+5:302025-10-04T05:46:00+5:30
दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवा अन्यथा ‘ऑपरेशन सिंदूर’च्यावेळी दाखवला तसा संयम पुढच्या वेळी दाखवणार नाही!

...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले
अनुपगड/जयपूर : जर पाकिस्तानला जागतिक नकाशावर टिकून राहायचे असेल, तर त्याने आपल्या भूमीवरून दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देणे थांबवले पाहिजे, असे खडेबोल भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी पाकिस्तानला सुनावले. ‘ऑपरेशन सिंदूर १’ दरम्यान भारताने दाखवलेला संयम पुढच्या वेळी दाखवला जाणार नाही. भारतीय जवानांनो पूर्णपणे सज्ज राहा, ईश्वराची इच्छा असेल तर लवकरच संधी येईल, असेही सूचक उद्गार द्विवेदी यांनी काढले.
राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनुपगड येथे भारतीय लष्कराच्या जवानांशी संवाद साधताना द्विवेदी म्हणाले की, पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांचे पुरावे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान साऱ्या जगासमोर मांडले. भारताने ही वस्तुस्थिती उघड केली. अन्यथा पाकिस्तानने या गोष्टी दडवून ठेवल्या असत्या, असे जनरल द्विवेदी म्हणाले.
‘आव्हाने पेलण्यास जवानांबरोबर नागरिकही सज्ज’
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, सीमावर्ती भागात राहणारे लोक हे देखील सैनिकच आहेत. ते लोक सैन्याच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. देशासमोर उभी ठाकणारी सर्व आव्हाने पेलण्यास लष्कराबरोबर भारतीय नागरिकही सज्ज आहेत.
अखंडतेसाठी कोणत्याही सीमा ओलांडू शकतो भारत
हैदराबाद : २०१६ सालचा सर्जिकल स्ट्राइक, २०१९ सालचा बालाकोट हवाई हल्ला आणि नुकतेच झालेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अशा घटनांतून देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्यासाठी भारत कोणत्याही सीमा ओलांडू शकतो, असे एनडीए सरकारने दाखवून दिल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी येथे केले.
पाकची १२ लष्करी विमाने पाडली : हवाई दलप्रमुख
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई दलाच्या कारवाईत पाकिस्तानची एफ-१६सह किमान १२ लष्करी विमाने भारताने पाडली, किंवा त्या विमानांची मोठी हानी झाली असल्याची माहिती हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी शुक्रवारी दिली.
भारतीय विमाने पाडल्याचे पाकिस्तानचे दावे खोटे आहेत. जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते दाखवावेत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ए. पी. सिंग यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये पाकिस्तानातील लष्करी ठाणी, हवाई तळांचे मोठे नुकसान झाले.
ऑपरेशन सिंदूरनंतर विविध दहशतवादी गटांनी खैबर पख्तुनख्वा प्रांतात आपले तळ हलविले. भारतीय हवाई दलाकडे अशा तळांवर अचूक हल्ला करण्याची पूर्ण क्षमता आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिमने उत्तम कामगिरी केली, असेही ते म्हणाले.