'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 09:14 IST2025-12-19T09:13:00+5:302025-12-19T09:14:37+5:30
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या कृतीचे समर्थन करत उत्तर प्रदेशचे मंत्री संजय निषाद यांनी एक विधान केले. त्यांच्या या विधानावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला.

'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
'जर संजय निषाद माझ्या समोर असते, तर मी त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता', असे विधान एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एका सभेत बोलताना केले. संजय निषाद हे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या कृतीचे समर्थन करताना निषाद यांनी एक विधान केले होते. त्यावरून जलील त्यांच्यावर भडकले.
हिजाब प्रकरणावरून हे सगळं घडलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात मुस्लीम तरुणीचा हिजाब हाताने खाली ओढला. यावरून बराच संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी नितीश कुमारांनी केलेली ही कृती चुकीची असल्याचे मत मांडले आहे.
संजय निषाद काय म्हणालेले?
मंत्री संजय निषाद यांनी या घटनेवर बोलताना म्हटले होते की, "हिजाबला हात लावला तर इतका गदारोळ झाला आहे आहे. त्यांनी दुसरीकडे कुठे हात लावला असता तर काय झालं असतं?"
निषाद यांच्या विधानावरून वादात भर पडली. त्यांच्या टीका झाली. त्यानंतर संजय निषाद यांनी केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली आणि म्हणाले की, कुणाचाही अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता.
इम्तियाज जलील काय म्हणाले?
निषाद यांनी माफी मागितली असली, तरी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी थेट हात तोडण्याची भाषा केली. परभणी येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना जलील म्हणाले की, "महिलांचा अपमान सहन करणार नाही. जे लोक आपल्या माता भगिनींचा अपमान करतात, आम्ही त्यांचे हात तोडू. अशा प्रकारची विधाने कोणत्याही परिस्थिती खपवून घेतली जाणार नाही. सहन करणार नाही."
नितीश कुमारांच्या सुरक्षेत वाढ
१५ डिसेंबर रोजी नितीश कुमारांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात नितीश कुमार नियुक्ती पत्राचे वाटप करत होते. त्याचवेळी नियुक्तीपत्र घेण्यासाठी एक मुस्लीम तरुणी आली. त्यावेळी नितीश कुमारांनी तिच्या चेहऱ्यावरील हिजाब हाताने खाली खेचला. यावरून बिहारच्या राजकारणात बराच गदारोळ झाला. दरम्यान, या घटनेनंतर नितीश कुमार यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.