"...तर मी कोणताही प्रश्न न विचारता राजकारणातून निवृत्ती होईन"; प्रशांत किशोरांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:29 IST2025-11-18T14:24:19+5:302025-11-18T14:29:23+5:30
Prashant Kishor retire from politics: जन सुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी घेत असून, त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या मुद्द्यावरही भूमिका स्पष्ट केली.

"...तर मी कोणताही प्रश्न न विचारता राजकारणातून निवृत्ती होईन"; प्रशांत किशोरांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली
Prashant Kishor Latest News: "आमच्याकडून नक्कीच काही चूक झाली आहे. जनतेने आम्हाला निवडून दिले नाही. जर लोकांचा आमच्यावर विश्वास नसेल, तर पराभवाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. मी पराभवाची शंभर टक्के जबाबदारी घेतो." हे विधान आहे जन सुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांचे. प्रशांत किशोर यांनी निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केले आणि राजकारण सोडण्याबद्दलच्या विधानावरही खुलासा केला.
बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रशांत किशोर यांनी निवडणुकीत लोकांपर्यंत मेसेज पोहोचवण्यात चूक झाली, असेही म्हटले आहे.
प्रामाणिक प्रयत्न केले, पण...
प्रशांत किशोर म्हणाले, "आमचे प्रयत्न प्रामाणिक होते. तरीही आम्हाला सपशेल अपयश आले आणि हे मान्य करण्यात कोणताही कमीपणा नाहीये. व्यवस्थात्मक बदल सोडून द्या, पण आम्ही सत्तेतही बदल घडवू शकलो नाही. असे असले तरी बिहारचे राजकारण बदलण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका निभावली."
"आम्ही प्रयत्न केले,पण नक्कीच त्यात काही चुका झाल्या. आमच्या विचार करण्यातही चूक झाली. जनतेने आम्हाला निवडून दिले नाही. जर जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला नाही, तर ती पूर्ण जबाबदारी माझी आहे. मी शंभर टक्के पराभवाची जबाबदारी स्वीकारतोय. मी बिहारच्या जनतेचा विश्वास संपादन करू शकलो नाही", असे प्रशांत किशोर यांनी पराभवाचे विश्लेषण करताना सांगितले.
प्रशांत किशोर म्हणाले, "तिथे मी अपयशी ठरलो"
"कोणत्या मुद्द्यावर मत दिले पाहिजे आणि नवी व्यवस्था का निर्माण केली पाहिजे, हे व्यवस्थितपणे बिहारच्या जनतेला सांगण्यात मी अपयशी ठरलो. प्रायश्चित म्हणून मी २० नोव्हेंबर रोजी पूर्ण दिवस गांधी आश्रमात मौन व्रत पाळणार आहे. आपण चुका करत असतो, पण आपण तो काही गुन्हा करत नाही", अशी भूमिका प्रशांत किशोर यांनी मांडली.
कोणत्याही जर-तर शिवाय राजकारणातून संन्यास घेईन
नितीश कुमार यांच्या पक्षाला २५ जागा मिळतील असे विधान प्रशांत किशोर यांनी केले होते. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "जेडीयूला २५ जागा मिळतील या माझ्या विधानाची लोक चर्चा करत आहेत. त्या विधानावर मी अजूनही ठाम आहे. जर नितीश कुमार यांनी प्रत्येक महिलेच्या खात्यात १० हजार रुपये टाकले नसते, तर त्यांना २५ पेक्षा जास्त जागा मिळाल्या नसत्या."
"नितीश कुमारांनी २ लाख रुपये खात्यात जमा केले नसते. दीड कोटी महिलांना वचन दिले. जर त्यांनी हे सिद्ध केले की, मते विकत घेऊन जिंकले नाहीत, तर मी कोणताही प्रश्न उपस्थित न करता राजकारणातून निवृत्त होईन", असे प्रशांत किशोर म्हणाले.
प्रशांत किशोर यांचा पुढचा प्लॅन काय?
"मी पुन्हा कठोर मेहनत घेणार आहे. जसे तुम्ही मला गेल्या तीन वर्षात मेहनत करताना बघितले. मी सगळी शक्ती ओतली होती. आता माघार घेण्याचा प्रश्नच नाहीये, जोपर्यंत माझा चांगला बिहारचा संकल्प पूर्ण होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही", असे सांगत प्रशांत किशोर यांनी पुढचा कार्यक्रमही जाहीर केला.