"…तर मी खासदारकीचा राजीनामा देईन", राहुल गांधींवरील धक्काबुक्कीच्या आरोपामुळे पप्पू यादव संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:35 IST2024-12-19T16:22:25+5:302024-12-19T16:35:11+5:30
MP Pappu Yadav : या प्रकरणात राहुल गांधी यांची भूमिका सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन, असे पप्पू यादव यांनी म्हटले आहे.

"…तर मी खासदारकीचा राजीनामा देईन", राहुल गांधींवरील धक्काबुक्कीच्या आरोपामुळे पप्पू यादव संतापले
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून बुधवारी संसदेत याचे पडसाद उमटले. यावरून आजही(गुरुवारी) गदारोळ सुरु आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षाचे खासदार पोस्टर आणि बॅनर्स घेऊन संसद परिसरात पोहोचले, तर दुसरीकडे विरोधक खासदारांनीही पोस्टर आणि बॅनर्स घेऊन निदर्शने सुरू केली.
यावेळी धक्काबुक्की झाली. ज्यात दोन खासदार जखमी झाले. या संपूर्ण धक्काबुक्कीसाठी भाजप राहुल गांधींना जबाबदार धरत आहे. त्यामुळे पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी याबाबत मोठा दावा केला आहे. या प्रकरणात राहुल गांधी यांची भूमिका सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन, असे पप्पू यादव यांनी म्हटले आहे.
पप्पू यादव म्हणाले, मी 7 वेळा खासदार झालो आहे. असे वातावरण मी आजपर्यंत पाहिले नव्हते. हा राडा झाला तेव्हा राहुल गांधी सभागृहात गेले होते, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील तणाव कमी व्हावा म्हणून मी त्यांना परत आणले. भाजप नेते निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींना गुंड म्हटले. तसेच, राहुल गांधींनी धक्का दिला तर भाजप व्हिडिओ का दाखवत नाही? या प्रकरणात राहुल गांधींचा हात असेल तर मी खासदारकीचा राजीनामा देईन, असे पप्पू यादव यांनी सांगितले.
गुन्हा दाखल करण्याबाबत पप्पू यादव म्हणाले की, भाजपचे लोक आपल्या हायकमांडला खूश करण्यासाठी खटला दाखल करत आहेत. तसेच, नेहमी खोट्याची मदत घेतली जात आहे. आज संसद परिसरात भाजप खासदार प्रताप सारंगी यांना झालेल्या दुखापतीत राहुल गांधींचा हात नाही. त्यावेळी ते संसदेत उपस्थित होते. भाजपा खासदार प्रताप सारंगी आपल्या या दुखापतीचे खोटे बोलत आहे, तो आयसीयूमध्ये झोपून राजकारण करत आहे, असे पप्पू यादव म्हणाले.
राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप
दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष संसद परिसरात निदर्शने करत आहेत. तर यावेळी सत्ताधारी पक्षाचे खासदार सुद्धा पोस्टर आणि बॅनर्स घेऊन संसद परिसरात पोहोचले. यादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत भाजप खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत जखमी झाले असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपने केला आहे.