ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 17:15 IST2025-08-13T17:11:28+5:302025-08-13T17:15:33+5:30
Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला होता. आता ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सैन्यदलांसोबत सर्वसामान्यांनीही केलेल्या प्रेरणादायी कामगिरीच्या कहाण्या समोर येत आहेत.

ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला होता. आता ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सैन्यदलांसोबत सर्वसामान्यांनीही केलेल्या प्रेरणादायी कामगिरीच्या कहाण्या समोर येत आहेत. गुजरातमधील भारत-पाकिस्तान सीमेपासून २० किमी अंतरावर असलेल्या बनासकांठा जिल्ह्यातील जलोय गाव सध्या असाच चर्चेत आहे. भारताच्या हद्दीतील शेवटचा गाव अशी ओळख असलेल्या या गावचे सरपंच थानाभाई डोडिया यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ला येथे होणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय लष्कराची मदत केल्याने त्यांना हा सन्मान देण्यात येत आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थानाभाई डोडिया यांनी सांगितले की, मला लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून बोलावण्यात आलं आहे. त्यासाठी मी भारत सरकार आणि गुजरात सरकारचे आभार मानतो, असे थानाभाई डोडिया म्हणाले.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूर सुरू असताना जलोया गावातील रहिवाशांनी भारतीय सैन्यदलाला खूप मदत केली होती. जेव्हा लष्कराला मशीनची आवश्यकता होती तेव्हा मशीन पुरवण्यात आल्या. जेव्हा कामगार हवे होते तेव्हा ग्रामस्थ काम करण्यासाठी पुढे सरसारवले. आता या मदतीमुळे आम्हाला हा सन्मान मिळत आहे. मोदींनी आम्हाला ही संधी देऊन आमच्यामध्ये अभिमान निर्माण केला आहे. आमच्या गावातील ग्रामस्थांचा सुरक्षा दलांसोबत उत्तम ताळमेळ आहे. आम्ही मिळून योजना आखतो आणि एकत्र काम करतो. ग्रामस्थांनी नेहमीच बीएसएफला मदत केली आहे. तसेच त्यांनीही आम्हाला चांगली साथ दिली आहे, असेही सरपंच थानाभाई डोडिया यांनी सांगितले.