रेल्वेची पटरी तुटल्यास थेट अधिकाऱ्यांना जाणार मेसेज; CELच्या अभियंत्यांचा अनोखा शोध, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 17:01 IST2022-12-27T17:00:44+5:302022-12-27T17:01:44+5:30
Ghaziabad Train New System News: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे रेल्वेची पटरी तुटल्यास थेट संबंधित अधिकाऱ्याच्या मोबाईलवर मेसेज जाणार आहे.

रेल्वेची पटरी तुटल्यास थेट अधिकाऱ्यांना जाणार मेसेज; CELच्या अभियंत्यांचा अनोखा शोध, वाचा सविस्तर
गाझियाबाद : रेल्वे अपघातांची संख्या शून्यावर आणण्यासाठी विविध पातळ्यांवर काम केले जाते. असाच एक प्रयत्न उत्तर प्रदेशातील गाझियाबाद भागात असलेल्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (CEL) या एंटरप्राइझच्या अभियंत्यांनी अशा तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे, ज्याद्वारे रेल्वेची पटरी तुटण्याचा किंवा तडा गेल्याचा मेसेज रेल्वे प्रशासनाला जाईल. अधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर तात्काळ याबाबतची माहिती मिळू शकेल.
दरम्यान, या योजनेमुळे रेल्वे अपघात कमी होण्यास नक्कीच मदत होईल. हे तंत्रज्ञान सध्या दिल्ली मेट्रो ट्रेनच्या ट्रॅकवर वापरले जात आहे. लक्षणीय बाब म्हणजे त्याची यशस्वी चाचणीही झाली आहे. आगामी काळात बॉटनिकल गार्डन ते कालकाजी मंदिर स्थानकादरम्यान मेट्रो ट्रेनच्या रुळांवर ते बसवण्यात येणार आहे. यानंतर भारतीय रेल्वेच्या रुळांवरही ते बसवण्याची योजना आखली जाणार आहे.
हिवाळ्याच्या दिवसांत रेल्वे रुळांना तडे जाण्याचा किंवा तुटण्याचा धोका असल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे रेल्वे अपघाताचा धोका निर्माण होतो. या समस्येचा सामना करण्यासाठी CEL च्या अभियंत्यांनी आता ब्रोकन रेल डिटेक्शन सिस्टम (BRDS) विकसित केली आहे. पटरीवरील 500 मीटर अंतरावर ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्याच्या कक्षेत येणारा ट्रॅक तुटला किंवा त्याला तडा गेला, तर त्याचा मेसेज रेल्वे अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर लगेच जातो. त्यामुळे रुळांची वेळेत दुरुस्ती करता येईल.
रेल्वेची पटरी तुटल्यास येणार मेसेज
या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना सीईएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक चेतन प्रकाश जैन यांनी म्हटले की, अभियंत्यांनी आत्मनिर्भर भारत अंतर्गत बीआरडीएस ही प्रणाली विकसित केली आहे, ज्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वे रुळ तुटण्याची किंवा तडे गेल्याची माहिती लगेच मिळते. दिल्ली मेट्रोच्या ट्रॅकवर त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. दिल्लीतील इतर मेट्रो ट्रॅकवर देखील ते बसवण्यात येणार आहे. या प्रणालीअंतर्गत ट्रॅकला तडा गेल्यास किंवा तुटल्यास अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर तात्काळ मेसेज जाईल. कोणत्याही असामाजिक घटकाने रुळ तोडून रेल्वे अपघात सदृश परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचीही माहिती रेल्वे प्रशासनाला मिळणार आहे. रेल्वे प्रवास सुरक्षित करण्यासाठी ही व्यवस्था महत्त्वाची मानली जाते.
अशा प्रकारे काम करेल यंत्रणा
ही यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे स्थानकावर नियंत्रण कक्ष तयार करण्यात येणार असल्याचे चेतन प्रकाश जैन यांनी सांगितले. सर्व ठिकाणी बसविलेल्या बीआरडीएसची माहिती नियंत्रण कक्षाच्या संगणक स्क्रीनवर उपलब्ध होईल. त्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर देखील तयार करण्यात आले असून हे सॉफ्टवेअर रेल्वे अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर अपडेट केले जाणार आहे. त्यानंतर कोणत्याही ठिकाणी रेल्वे रुळ तुटल्यास किंवा तडा गेल्यास त्याचा मेसेज रेल्वे अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर जाईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"