प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 14:36 IST2025-08-14T14:36:19+5:302025-08-14T14:36:51+5:30
Uttar Pradesh Crime News: वाराणसी येथील प्रसिद्ध काशी हिंदू विद्यापीठामध्ये एका प्राध्यापकाने आपल्या विषयाच्या विभाग प्रमुखाच्या हत्येचा कट रचून त्याची सुपारी आपल्याच माजी विद्यार्थ्याला दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...
वाराणसी येथील प्रसिद्ध काशी हिंदू विद्यापीठामध्ये एका प्राध्यापकाने आपल्या विषयाच्या विभाग प्रमुखाच्या हत्येचा कट रचून त्याची सुपारी आपल्याच माजी विद्यार्थ्याला दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाराणसी येथील काशी हिंदू विद्यापीठातील तेलुगू विभागाचे विद्यमान विभागप्रमुख सी. एस. रामचंद्रमूर्ती यांच्यावर २८ जुलै रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातांना दुखापत झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केल्यावर हा हल्ल्यामागे विभागाचे माजी एचओडी आणि प्राध्यापक बुदाटी व्यंकटेश लू यांचा हात असल्याचे समोर आले. त्यांनी आपले माजी विद्यार्थी आणि इतरांना सुपारी देत हा हल्ला घडवून आणला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर सुपारी देणारे प्राध्यापक फरार आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार विभाग प्रमुखांवर हल्ला करण्यासाठी बुदाटी व्यंकटेश लू यांनी त्यांचे माजी विद्यार्थी बूतपूर भास्कर आणि कासिम यांच्याशी संपर्क साधला होता. एवढंच नाही तर ते दूरच्या ठिकाणी असल्याने त्यांची विमानामधून येण्याची व्यवस्थाही केली होती. त्यानंतर त्यांनी विद्यमान विभाग प्रमुखांवर हल्ला करवला. विद्यमान विभागप्रमुख रामचंद्रमूर्ती हे मला त्रास देतात, असे त्यांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांना सांगितले होते. त्यानंतर भास्कर आणि कासिम या त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी गणेस पासी नावाच्या एका स्थानिकाशी संपर्क साधला. गणेशने आणखी दोन जणांना बोलावून रामचंद्रमूर्ती यांच्यावर हल्ला केला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. यादरम्यान, एका हॉटेलजवळ अशोकपूरम कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस आणि गणेश पासी यांच्यात चकमक झाली. यादरम्यान, गणेश याने पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरदाखल केलेल्या गोळीबारात गणेश याच्या पायाला गोळ्या लागल्या. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच पोलिसांनी बूतपूर भास्कर यालाही ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती देताना डीसीपी क्राईम सरवणन टी. यांनी सांगितले की, माजी विभागप्रमुख पप्राध्यापक व्यंकटेश लू आणि विद्यमान विभागप्रमुख प्रा. रामचंद्रमूर्ती यांच्यामध्ये प्रशासकीय मुद्द्यांवरून मतभेद होते. त्यामुळेच प्राध्यापक लू. यांनी माजी विद्यार्थ्यांची मदत घेऊन रामचंद्रमूर्ती यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. आता यासाठी ४८ हजार रुपयांची देवाणघेवाण झाली होती, अशी माहिती समोर आली आहे. तसेच पोलिसांना त्यांच्यामध्ये फोनपेवरून पैशांचे व्यवहार झाल्याचे पुरावेही मिळाले आहेत.