पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 05:24 IST2025-09-28T05:23:42+5:302025-09-28T05:24:06+5:30
पाक पंतप्रधानांच्या खोट्या दाव्यांना प्रत्युत्तर

पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
संयुक्त राष्ट्रे : पहलगाम हल्ल्यानंतर मे महिन्यात झालेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यानपाकिस्तानच्या लष्करानेच युद्ध थांबविण्यासाठी भारताला विनंती केली होती, असे खडेबोल भारतानेपाकिस्तानला सुनावले. या दोन्ही देशांमधील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कोणाचीही मध्यस्थी नको, अशी ठाम भूमिकाही भारताने मांडली.
दहशतवाद्यांना, तसेच त्यांच्या घातपाती कृत्यांना पाठीशी घालणारे भाषण पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत शुक्रवारी सकाळी केले होते. त्यानंतर त्या भाषणावरून संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी मिशनमधील फर्स्ट सेक्रेटरी पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानला धारेवर धरले.
त्यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान झालेले युद्ध आपण जिंकल्याचा पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचा दावा हास्यास्पद आहे. १० मे रोजी त्यांच्या लष्कराने थेट भारताशी संपर्क करून युद्ध थांबविण्यासाठी विनवणी केली. तोवर भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यांत पाकिस्तानच्या हवाई तळांचे मोठे नुकसान झाले होते. हल्ल्यांमुळे बेचिराख झालेली धावपट्टी, उद्ध्वस्त हँगर हे विजयाचे चिन्ह मानायचे असतील, तर पाकिस्तान तो ‘विजय’ नक्की साजरा करू शकतो, अशी उपरोधिक टीका पेटल गेहलोत यांनी केली.
पाक दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न
नियंत्रणरेषेच्या पलीकडे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी दहशतवादी सज्ज असल्याचे सीमा सुरक्षा दलाने शनिवारी म्हटले आहे. ही घुसखोरी रोखण्यासाठी, तसेच कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास भारतीय सुरक्षा दले सज्ज आहेत. काश्मीरमधील बांदीपोरा, कुपवाडा क्षेत्रात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी हद्दीत दहशतवादी जमा झाले आहेत. त्याबद्दलची माहिती भारतीय सुरक्षा दलांना मिळाली आहे, असे बीएसएफचे काश्मीर फ्रंटियरचे महानिरीक्षक अशोक यादव यांनी सांगितले.
‘द्विपक्षीय चर्चेत कोणाचीही मध्यस्थी बिल्कुल नको’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानेच शस्त्रसंधी झाली, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी केला होता. त्यावर कठोर टीका करताना पेटल गेहलोत यांनी म्हटले आहे की, भारत, पाकिस्तानच्या सैन्यदलांतील डीजीएमओ स्तरावर झालेल्या थेट चर्चेनंतरच शस्त्रसंधी झाली. दोन देशांतील कोणतेही प्रश्न द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातूनच सोडवले जातील. त्यामुळे त्यात तिसऱ्या घटकाच्या मध्यस्थीचा संबंधच नाही.
‘पाकने दहशतवाद्यांचे सर्व तळ बंद करावेत’
संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी मिशनमधील फर्स्ट सेक्रेटरी पेटल गेहलोत म्हणाल्या की, द्विपक्षीय संवादासाठी तयार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी सांगितले आहे.
पाकिस्तान खरोखरच प्रामाणिक असेल, तर त्याने आधी दहशतवाद्यांचे सर्व तळ बंद करावेत. भारतात घातपाती कारवाया केलेल्या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावे. पाकिस्तान हा द्वेष, धर्मांधता आणि असहिष्णुताची भावना पसरवत आहे, अशी टीकाही भारताने केली.