रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 08:34 IST2025-07-10T08:34:06+5:302025-07-10T08:34:47+5:30
रात्रीच्या अंधारात विकासला घरात शिरताना कुणीतरी पाहिले आणि त्याला चोर समजून आरडाओरडा केला. घरातील लोकही जागे झाले आणि सर्वांनी मिळून विकासला मारले.

रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय?
मध्यरात्रीचा काळोख... एक तरुण चोरपावलांनी एका घरात शिरला. अचानक लाईट लागली आणि घरातील लोक जागे झाले. तरुणाला पाहताच ते ओरडले - "चोर! चोर!" मग काय विचारता? जमावाने त्याला बेदम मारहाण केली. तरुण गयावया करत म्हणाला, "कृपया एकदा माझं ऐका तरी!" त्याने मग स्वतःबद्दल अशी काही गोष्ट सांगितली की, त्या कुटुंबाने दुसऱ्याच दिवशी सकाळी त्याला आपला जावई बनवून घेतले. आता या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील आहे.
खरं तर, ज्या घरात तो तरुण घुसला होता, तिथे त्याची प्रेयसी राहत होती. मध्यरात्री तो तिला भेटायलाच गेला होता. पण नशीबच खराब! प्रेयसीच्या घरच्यांनी त्याला चोर समजून बडवले. नंतर जेव्हा मुलाने खरं काय ते सांगितले, तेव्हा दुसऱ्याच दिवशी कुटुंबियांनी आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावून दिले.
चोर समजून मारले...
मिळालेल्या माहितीनुसार, जासरपतहां पोलीस स्टेशन हद्दीतील करीमपूर खुर्द गावातील ही अजब-गजब घटना आहे. सोमवारी रात्री, खुटहन पोलिस स्टेशन हद्दीतील पनौली गावाचा रहिवासी विकास पासवान आपली प्रेयसी रुबीला भेटण्यासाठी गुपचूप तिच्या घरात घुसला. रात्रीच्या अंधारात विकासला घरात शिरताना कुणीतरी पाहिले आणि त्याला चोर समजून आरडाओरडा केला. घरातील लोकही जागे झाले आणि सर्वांनी मिळून विकासला पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली.
आणि मग झाली चर्चा लग्नाची...
पकडल्यानंतर जेव्हा तरुणाची चौकशी केली, तेव्हा त्याची ओळख विकास पासवान अशी पटली. विकासने सांगितले की, तो चोर नसून आपल्या प्रेयसीला भेटायला आला होता. त्याने आपल्या प्रेयसीचे नाव रुबी असल्याचे सांगितले. ही बाब रुबीकडे विचारली असता तिनेही दुजोरा दिला की, त्यांचे प्रेमप्रकरण सुरू आहे आणि तिला त्याच्यासोबतच राहायचे आहे. मग काय, दुसऱ्याच दिवशी सकाळी दोघांचे लग्न लावून देण्यात आले. आता या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.