नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 21:23 IST2025-12-03T21:19:48+5:302025-12-03T21:23:30+5:30
NCP SP MP Supriya Sule In Parliament Winter Session 2025: शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीसंदर्भात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीवरून सुप्रिया सुळे यांनी संसदेत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
NCP SP MP Supriya Sule In Parliament Winter Session 2025: राज्यातील सर्व २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्रितपणे जाहीर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर तसेच औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोगाला दिला. दुबार मतदारांमुळे गाजलेल्या निवडणुकीचा 'दुबार' निकाल टळला. अनेक ठिकाणी 'दुबार' मतदारांमुळे मतदानावेळी गोंधळ उडाला. राज्यात दुपारी ३.३० पर्यंत सरासरी ४७.५१ टक्के मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांच्या मतदानावेळी झालेल्या गोंधळाचे पडसाद संसदेत उमटले. संसदेच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा मांडत महाराष्ट्रातील महायुती सरकारवर टीका केली.
महाराष्ट्रात मंगळवारी नगरपंचायत आणि नगरपरिषदेची जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असे झाले की, प्रचंड मारामाऱ्या, बंदुका दाखवणे आणि एवढा सगळा गोंधळ या निवडणुकीत झाला. असे याआधी महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही झालेले नाही, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला.
शेतकऱ्यांना न्याय द्यायचे काम सरकारकडून होत नाही
कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि मदतीचा जो प्रस्ताव होता तो अद्याप महाराष्ट्र सरकारने दिला नाही. यावर, खरे तर हे दुर्देव आहे की, सत्तेत येताना महायुतीमधील नेते वारंवार सांगत होते की, आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. शेतकऱ्यांना अतिवृष्टीत मदत करू. पण आता तसे होताना दिसत नाही. शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना न्याय द्यायचे काम सरकारकडून होत नाही. त्यामुळे केंद्र सरकारला माझी विनंती आहे की, महाराष्ट्रात झालेला हा सर्व सावळा गोंधळ पाहता केंद्र सरकारने राज्य सरकारला विनंती करावी की, शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव तातडीने घ्यावा. कारण शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, मतमोजणी २१ डिसेंबरला असल्याने मतदान यंत्रे १९ दिवस सुरक्षित ठेवण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी २४ तास सशस्त्र चोख सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे आदेश आयोगाने दिले. उमेदवारांच्या मनात शंका राहू नये, यासाठी त्यांच्या प्रतिनिधींना गोदामाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पहारा देण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मतदान यंत्रे ठेवण्यात येणाऱ्या गोदामाच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. गोडाऊन बाहेर सीसीटीव्ही, सुरक्षा अलार्म यंत्रणा कार्यान्वित असल्याची खात्री करावी. आवश्यक तिथे बॅरेकेटींग करावे, गोदामाच्या ठिकाणी केवळ अधिकृत व्यक्तींनाच लॉगबुकमध्ये नोंद करून प्रवेश देण्यात यावा.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळाचा मुद्दा आज लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान उपस्थित केला.
— Supriya Sule (@supriya_sule) December 3, 2025
महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव… pic.twitter.com/VMyKFIL545