भारताच्या 'दुर्गा' सीमेचं रक्षण करणार, चीन सीमेवर महिला कमांडो; १० चौक्या उभ्या राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 10:26 IST2025-11-24T10:23:27+5:302025-11-24T10:26:01+5:30
ITBP उभारणार १० 'ऑल-वुमन' बॉर्डर पोस्ट, 'फॉरवर्डायझेशन' योजना; सीमेवर सुरक्षा वाढणार

भारताच्या 'दुर्गा' सीमेचं रक्षण करणार, चीन सीमेवर महिला कमांडो; १० चौक्या उभ्या राहणार
नवी दिल्ली/जम्मू : भारताचीचीनबरोबरची ३,४८८ किलोमीटर लांबीची दुर्गम आणि बर्फाच्छादित वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) सांभाळणारे इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दल या सीमेवर लवकरच १० पूर्णपणे महिलांच्या सीमा चौक्या स्थापन करणार आहे.
आयटीबीपीचे महासंचालक प्रवीण कुमार यांनी जम्मू येथे झालेल्या ६४ व्या स्थापना दिवस परेडमध्ये ही माहिती दिली. २०२० च्या लडाखमधील लष्करी संघर्षानंतर आयटीबीपीने आपली 'फॉरवर्डायझेशन' योजना सुरू केली आहे. या अंतर्गत, आतापर्यंत २१५ सीमा चौक्या महत्त्वाच्या ठिकाणी हलवण्यात आल्या आहेत. या योजनेला बळ देण्यासाठी, केंद्राने २०२३ मध्ये आयटीबीपीसाठी ९,४०० कर्मचाऱ्यांची भरती असलेल्या सात नवीन बटालियन आणि एका सेक्टर मुख्यालयाला मंजुरी दिली आहे.
‘आयटीबीपी’त महिला जवानांचे योगदान वाढतेय
लडाखमधील लुकिंग आणि हिमाचल प्रदेशातील ठांगी येथे दोन पूर्णपणे महिलांच्या सीमा चौक्या स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय, आणखी आठ पूर्णपणे महिलांच्या चौक्या या सीमेवर लवकरच कार्यान्वित केल्या जातील, असे डीजी म्हणाले. एका लाखांहून अधिक मनुष्यबळ असलेल्या आयटीबीपीच्या चौक्या ९,००० फूट ते १४,००० फुटांपेक्षा अधिक उंचीवर आहेत. १९६२ मध्ये स्थापन झालेले हे दल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते.