मशाल, 'तुतारी'वरच लढवाव्या लागणार सध्याच्या निवडणुका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 08:10 IST2025-11-13T08:09:10+5:302025-11-13T08:10:16+5:30
Supreme Court News: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावर २१ जानेवारी २०२६ रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. २१ तारखेला सुनावणी पूर्ण नाही होऊ शकली तर २२ जानेवारीला सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.

मशाल, 'तुतारी'वरच लढवाव्या लागणार सध्याच्या निवडणुका
नवी दिल्ली - शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावर २१ जानेवारी २०२६ रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. २१ तारखेला सुनावणी पूर्ण नाही होऊ शकली तर २२ जानेवारीला सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्धवसेनेला मशाल चिन्हावर तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हांवरच लढवाव्या लागणार आहेत.
काय आहे याचिका?
निवडणूक आयोगाने 'शिवसेना' पक्ष व 'धनुष्यबाण' हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिला. याविरुद्ध उद्धव ठाकरे यांनी याचिका दाखल केली होती.
आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार यांच्या गटाला देण्याचा निकाल दिला होता. शरद पवार यांनी सुद्धा या निर्णयाला आव्हान दिले आहे.
दोन्ही प्रकरणे एकदाच : राष्ट्रवादीशी संबंधित खटल्याचीही याचवेळी सुनावणी घेतली जाईल. कायदेशीर प्रश्न समान असल्याने दोन्ही प्रकरणांची एकत्रित सुनावणी होईल, असे न्या. सूर्यकांत व न्या. जॉयमल्या बागची यांच्या पीठाने स्पष्ट केले.