नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 11:58 IST2025-12-28T11:56:55+5:302025-12-28T11:58:02+5:30
सिंह यांनी अपलोड केलेल्या छायाचित्रासोबतच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, रा. स्व. संघाचा तळागाळातील एक स्वयंसेवक व जनसंघ–भाजपचा कार्यकर्ता नेत्यांच्या पायांशी जमिनीवर बसत होता. त्यानंतर भविष्यात तो राज्याचा मुख्यमंत्री व देशाचा पंतप्रधान झाला. हीच संघटनेची शक्ती आहे.

नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
नवी दिल्ली : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संघटनशक्तीची काँग्रेस पक्ष कार्यकारिणी बैठकीच्या आधी प्रशंसा करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी खळबळ उडवून दिली. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी खुर्चीवर बसलेले व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यापुढे जमिनीवर बसलेले, असे एक जुने छायाचित्रही दिग्विजय सिंह यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केले.
सिंह यांनी अपलोड केलेल्या छायाचित्रासोबतच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, रा. स्व. संघाचा तळागाळातील एक स्वयंसेवक व जनसंघ–भाजपचा कार्यकर्ता नेत्यांच्या पायांशी जमिनीवर बसत होता. त्यानंतर भविष्यात तो राज्याचा मुख्यमंत्री व देशाचा पंतप्रधान झाला. हीच संघटनेची शक्ती आहे.
‘...तर भारताचा पराभव’
परराष्ट्र धोरण हे भारताचे आहे, कोणत्या पक्षाचे नाही. राजकारणात कुणी याबाबत पंतप्रधानांच्या पराभवावर आनंद व्यक्त करीत असेल तर ते भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करण्यासारखे आहे, असे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी म्हटले.
‘काँग्रेसमध्ये विकेंद्रीकरण होणे आवश्यक आहे’
सूत्रांनी सांगितले, दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही पक्ष संघटनेत विकेंद्रीकरण झाले पाहिजे, अशी भूमिका मांडली. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इतर नेत्यांनाही बोलायचे आहे सांगत, त्यांना थांबविले. त्यांच्या पोस्टबाबत चर्चा सुरू होताच दिग्विजय सिंह म्हणाले की, मी भाजप, रा. स्व. संघाच्या धोरणांचा कट्टर विरोधक आहे. मात्र, या दोघांच्या फक्त संघटनशक्तीची मी तारीफ केली.