केंद्राकडून राज्यपालांचा दुरुपयोग करत राज्य सरकारांच्या कामात अडथळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 08:35 IST2025-05-22T08:35:30+5:302025-05-22T08:35:30+5:30
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या एका पोस्टला टॅग केले आहे.

केंद्राकडून राज्यपालांचा दुरुपयोग करत राज्य सरकारांच्या कामात अडथळे
नवी दिल्ली : केंद्र सरकार राज्यपालांचा दुरुपयोग करून राज्य सरकारांच्या कामकाजात अडथळे निर्माण करत आहे. त्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दडपला जात आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. संघराज्याच्या संरचनेवर होत असलेल्या या हल्ल्यांचा प्रतिकार केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले की, भारताची खरी ताकद त्याच्या विविधतेत आहे. या संघराज्यात प्रत्येक राज्याला त्याचे वैशिष्ट्य व त्याचे मत आहे. मात्र केंद्र सरकार राज्यपालांचा दुरुपयोग करून राज्य सरकारांच्या कारभारात अडचणी निर्माण करत आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या एका पोस्टला टॅग केले आहे. या पोस्टमध्ये एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारांना कमकुवत करण्याचा केंद्र सरकारचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. त्यांना राज्य सरकार राज्यपालांच्या नियंत्रणाखाली ठेवायचे आहे.
‘त्या’ निर्णयाला मद्रास हायकोर्टाची स्थगिती
विद्यापीठांतील कुलगुरुंच्या नियुक्ती संदर्भात राज्यपालांचे अधिकाऱ्या काढून घेण्यासाठी तामिळनाडू विधानसभेतील संशोधित विधेयकाला मद्रास उच्च न्यायालाने बुधवारी स्थगिती दिली. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्या. जी. आर. स्वामीनाथ व व्ही लक्ष्मीनारायण यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. तिरुनेलवेली येथील वकील कुट्टी उर्फ के. वेंकटचलपती यांनी ही याचिका दाखल केली होती.