नवी दिल्ली : स्मारक बांधता येईल अशी जागा न निवडता निगमबोध घाटावर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय भाजपप्रणीत केंद्र सरकारने घेतला. या सरकारने देशाच्या थोर सुपुत्राचा व पहिल्या शीख पंतप्रधानांचा घोर अपमान केला आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला. त्यावर केंद्र सरकारने म्हटले आहे की, त्यांचे स्मारक उभारण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. स्मारकासाठी जागा निश्चित करून त्यासाठी ट्रस्ट स्थापन केला जाईल.
राहुल गांधी म्हणाले की, मनमोहनसिंग १० वर्षे पंतप्रधान होते. त्यांनी आखलेल्या धोरणांमुळे आजही गरीब व मागासवर्गीयांना मोठे बळ मिळते. आजवर सर्व माजी पंतप्रधानांचे अंतिम संस्कार विशिष्ट स्थळी करण्यात आले. मात्र मनमोहनसिंग यांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी भाजपप्रणीत सरकारने वेगळी भूमिका घेतली. काँग्रेसच्या सरचिटणीस व खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी भाजपप्रणीत केंद्र सरकारने योग्य जागा उपलब्ध करून दिली नाही.
सरकारने म्हटले आहे की, मनमोहनसिंग यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय शुक्रवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कळविले होते. या स्मारकासाठी ट्रस्टची स्थापना व जागेची निवड करणे याला काही कालावधी लागू शकतो, असेही सरकारने म्हटले होते.
विनाकारण वाद वाढविला : गहलोतअंत्यसंस्कार आणि स्मारकावरून केंद्र सरकारने विनाकारण वाद वाढवल्याचा आरोप शनिवारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गहलोत यांनी केला. ते म्हणाले की, २०१२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे निधन झाले तेव्हा तत्कालीन काँग्रेस सरकारने मुंबईच्या शिवाजी पार्कवर विशेष जागा निश्चित करून ठाकरेंचे अंत्यसंस्कार केले. काँग्रेसने सदैव सर्व पक्षांच्या नेत्यांना सन्मानजनक निरोप दिला. मात्र, भाजपने मनमोहन सिंग यांच्यासंदर्भात जे वर्तन केले ते अत्यंत दुर्दैवी आहे.