...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:55 IST2025-12-17T13:54:44+5:302025-12-17T13:55:18+5:30
या प्रस्तावानंतर वाजपेयी यांनी राष्ट्रपतीपदासाठी सर्वसंमती मिळवण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू केली. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांनी बैठकीचे आमंत्रण दिले.

...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
नवी दिल्ली - एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचे ११ वे राष्ट्रपती बनवण्याआधी भारतीय जनता पार्टीने तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना राष्ट्रपतीपद तर लालकृष्ण आडवाणी यांना पंतप्रधानपद देण्याचे प्रस्ताव ठेवला होता. परंतु वाजपेयी यांनी हा प्रस्ताव नाकारला होता. हा दावा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे माध्यम सल्लागार राहिलेले अशोक टंडन यांनी त्यांच्या अटल संस्मरण पुस्तकात केला आहे.
अशोक टंडन यांचं पुस्तक अटल संस्मरण प्रभात प्रकाशनाने प्रकाशित केले. टंडन १९९८ ते २००४ या काळात वाजपेयी यांचे माध्यम सल्लागार होते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात म्हटलंय की, कुठल्याही पंतप्रधानाने बहुमताच्या जोरावर राष्ट्रपती बनणे भारतीय संसदीय लोकशाहीसाठी योग्य ठरणार नाही असं वाजपेयींना वाटत होते. त्यामुळे वाजपेयी या प्रस्तावावर विचार करायला तयार नव्हते. ही प्रथा अत्यंत चुकीची होईल असंही वाजपेयी म्हणाले होते असा खुलासा करण्यात आला आहे.
या प्रस्तावानंतर वाजपेयी यांनी राष्ट्रपतीपदासाठी सर्वसंमती मिळवण्याच्या दृष्टीने हालचाल सुरू केली. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांनी बैठकीचे आमंत्रण दिले. त्या बैठकीला सोनिया गांधी, प्रणब मुखर्जी आणि डॉ. मनमोहन सिंग सहभागी झाले होते. या बैठकीत वाजपेयी यांनी पहिल्यांदा अधिकृतपणे राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना उमेदवार बनवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. बैठकीत काही काळ शांतता पसरली. त्यानंतर सोनिया गांधी यांनी मौन सोडले आणि या निवडीमुळे आम्ही हैराण आहोत असं म्हटलं. आमच्याकडे पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही परंतु या प्रस्तावावर चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असं सोनिया गांधींनी बैठकीत सांगितले असं पुस्तकात छापले आहे.
त्यानंतर एपीजे अब्दुल कलाम यांना २००२ साली एनडीए आणि विरोधकांच्या पाठिंब्याने भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून निवडले. २००७ पर्यंत अब्दुल कलाम यांनी ते पद सांभाळले. टंडन यांनी त्यांच्या पुस्तकात वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात घडलेल्या अन्य घटनांचाही उल्लेख केला आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्या जोडीवर सांगताना काही धोरणात्मक मुद्द्यांवर मतभेद असतानाही दोन्ही नेत्यांनी कधीही त्यांचे संबंध सार्वजनिकरित्या खराब होऊ दिले नाहीत असंही पुस्तकात म्हटलं आहे.
संसदेवरील हल्ल्याचा उल्लेख
पुस्तकात १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी झालेल्या महत्त्वाच्या घटनेचा खुलासा केला आहे. त्यादिवशी वाजपेयी त्यांच्या निवासस्थानी होते आणि टीव्ही सुरक्षा जवानांची कारवाई पाहत होते. तेव्हा तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा आणि लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना फोन करून मला तुमची चिंता वाटली. आपण सुरक्षित आहात ना अशी विचारणा केली होती. तेव्हा वाजपेयी यांनी सोनिया जी, मी सुरक्षित आहे. मला चिंता होती की तुम्ही कदाचित संसद भवनात असाल, तुम्ही काळजी घ्या असं म्हटलं होते.