"ती छेडछाड खरी नव्हती, स्वप्न होतं...!" ७ वर्षांनंतर मेहुणीनं कोर्टात सांगितलं सत्य, हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त; वाचा संपूर्ण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:59 IST2026-03-10T13:58:35+5:302026-03-10T13:59:26+5:30
या आरोपांमुळे एअरफोर्स कर्मचाऱ्याला १९ दिवस तुरुंगवासही झाला होता.

"ती छेडछाड खरी नव्हती, स्वप्न होतं...!" ७ वर्षांनंतर मेहुणीनं कोर्टात सांगितलं सत्य, हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त; वाचा संपूर्ण प्रकरण
एका अल्पवयीन मेहुणीने आपल्या मेहुण्यावर लावलेला विनयभंगाचा आरोप तब्बल ७ वर्षांनंतर खोटा सिद्ध झाला आहे. "ती घटना प्रत्यक्षात घडली नाही, तर ते एक स्वप्न होते," असे मेहुणीने न्यायालयात सांगितल्यानंतर विशेष न्यायाधीशांनी संबंधित एअरफोर्स कर्मचाऱ्याची निर्दोष मुक्तता केली आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी:
उत्तर प्रदेशातील बिठूर येथील रहिवासी असलेल्या आणि सध्या पुण्यात कॉर्पोरल पदावर तैनात असलेल्या या एअरफोर्स कर्मचाऱ्याचा विवाह फेब्रुवारी २०१९ मध्ये झाला होता. लग्नानंतर पत्नीला माहेरून आणण्यासाठी तो सासरी गेला होता. तेथून पत्नीला आणताना त्यांच्यासोबत एक १५ वर्षीय मेहुणीही आली होती. ८ मार्च २०१९ च्या रात्री ९ वाजता ही मुलगी अचानक ओरडू लागली. तिने आपल्या मेहुण्याने विनयभंग केल्याचा आरोप केला. यानंतर, तिच्या वडिलांनी नौबस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या आरोपांमुळे एअरफोर्स कर्मचाऱ्याला १९ दिवस तुरुंगवासही झाला होता.
कोर्टात काय घडलं...? -
डिसेंबर २०२१ मध्ये न्यायालयात साक्ष देताना पीडितेने सांगितले की, "त्या रात्री मी अँटीबायोटिक औषध घेऊन झोपले होते. झोपेत मला स्वप्न पडले की जीजूने मला पकडले आहे. त्यामुळे मी आरडाओरडा केला. पण ते केवळ स्वप्न होते. प्रत्यक्षात असे काहीही घडले नव्हते." पीडितेच्या वडिलांनी आणि मोठ्या बहिणीने देखील केवळ भ्रमातून हा गुन्हा दाखल केल्याची कबुली न्यायालयात दिली.
वरिष्ठ अधिवक्ता करीम अहमद सिद्दीकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीवर लैंगिक हल्ला आणि मारहाणीचे आरोप निश्चित करण्यात आले होते. मात्र, पीडितेच्या या ताज्या बयानानंतर न्यायालयाने पुराव्यांअभावी एअरफोर्स कर्मचाऱ्याला सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले.