थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:48 IST2025-11-26T13:47:39+5:302025-11-26T13:48:23+5:30
Thar owner legal notice DGP: ८ नोव्हेंबर रोजी एका पत्रकार परिषदेत सिंह यांनी थार आणि बुलेट चालकांबद्दल वादग्रस्त विधान केले होते.

थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
आपल्या वादग्रस्त विधानामुळे हरियाणाचे पोलिस महासंचालक ओम प्रकाश सिंह हे अडचणीत आले आहेत. थार आणि बुलेट गाड्यांच्या मालकांना ‘गुन्हेगार’ आणि ‘मानसिक अस्थिर’ संबोधल्यामुळे गुरगाव येथील एका थार मालकाने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
८ नोव्हेंबर रोजी एका पत्रकार परिषदेत सिंह यांनी थार आणि बुलेट चालकांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. "पोलिस सर्व गाड्यांना नाही, फक्त थार आणि बुलेटवाल्यांना पकडतील. थार आणि बुलेट चालवणारे सर्व लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे बदमाश असतात. गाडीची निवड ही त्यांची मानसिकता दर्शवते. थार घेणार आणि स्टंट करणार. ज्याच्याकडे थार असेल, त्याचे डोके फिरलेले असते," असे ते म्हणाले होते.
यावरून गुरुग्रामचे रहिवासी सर्वो मित्र यांनी वकिलाकरवी सिंह यांना नोटीस पाठविली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समाजात त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची खिल्ली उडवली जात आहे. त्यांच्या मुलांनाही शाळेत चिडवले जात आहे, ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या मुलांना मानसिक तणाव आणि लज्जा सहन करावी लागत आहे. त्यांनी २०२३ मध्ये ३० लाख रुपये खर्च करून कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी थार गाडी खरेदी केली होती, मात्र या घटनेनंतर त्यांना गाडी चालवणे बंद करावे लागले आहे.
१५ दिवसांत माफीची मागणी
या कायदेशीर नोटीसीद्वारे सर्वो मित्र यांनी डीजीपी ओम प्रकाश सिंह यांना त्यांचे विधान त्वरित मागे घेण्याची आणि १५ दिवसांच्या आत सार्वजनिकरित्या माफी मागण्याची मागणी केली आहे. जर त्यांनी असे केले नाही, तर त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.