जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. दरम्यान, आता पहलगाम हल्ल्या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. हा हल्ला पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांचा कट होता, असं एका अहवालामध्ये म्हटले आहे. भारत सरकारने यावर कोणतीही अधिकृत टिप्पणी केलेली नाही.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची योजना आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा यांनी आखली होती, अशी माहिती समोर आली आहे. याचे निर्देश पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त आहे. ही घटना घडवून आणण्यासाठी पाकिस्तानी दहशतवादी विशेषतः सहभागी असल्याचेही समोर आले आहे.
अहवालानुसार, आयएसआयने लष्कर कमांडर साजिद जट्टला जम्मू आणि काश्मीरमध्ये फक्त परदेशी दहशतवाद्यांना तैनात करण्याचे निर्देश दिले होते. गुप्तता राखण्यासाठी कोणत्याही काश्मिरी दहशतवाद्याचा समावेश नव्हता. हा हल्ला करणाऱ्या गटाचे नेतृत्व सुलेमान करत होता. तो पाकिस्तानी स्पेशल फोर्सेसचा माजी कमांडो असल्याचा संशय आहे. २०२२ मध्ये जम्मूमध्ये घुसखोरी करण्यापूर्वी त्याने लष्करच्या मुरीदके येथील लपण्याच्या ठिकाणी प्रशिक्षण घेतले होते.
सॅटेलाइट फोन विश्लेषणाचा हवाला देत, अहवालात म्हटले आहे की सुलेमानचे स्थान १५ एप्रिल रोजी त्रालमध्ये होते. यावरून असे दिसून येते की तो घटनेच्या सुमारे एक आठवडा आधी बैसरन खोऱ्यात होता.
'ऑपरेशन सिंदूर'मधून प्रत्युत्तर
७ मे रोजी, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून, भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. या काळात दहशतवाद्यांचे अनेक महत्त्वाचे अड्डे उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केला.