ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 13:44 IST2025-11-22T13:43:57+5:302025-11-22T13:44:28+5:30
Jammu-Kashmir : दिल्ली स्फोटानंतर नव्या "व्हाइट कॉलर" मॉड्यूलची भीती.

ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
Jammu-Kashmir : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील अनेक दहशतवादी अड्डे नष्ट केले. त्या घटनेच्या काही महिन्यानंतर, जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हालचालींना वेग आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. गुप्तचर अहवालांनुसार, पाकिस्तान समर्थित गट राज्यात सामान्य नागरिक आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी मूव्हिंग व्हेईकल IED चा वापर करुन सुसाईड बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत आहेत.
दहशतवाद्यांची संख्या अचानक वाढली
POK आणि पाकिस्तानातील दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केल्यानंतर दहशतवाद कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर परिस्थिती बदलली असून, सक्रिय दहशतवाद्यांची संख्या वाढली आहे. यातील बहुतांश दहशतवादी पाकिस्तानी आहेत. काश्मीरमध्ये स्थानिक दहशतवाद्यांची संख्या फक्त झाली आहे, मात्र अजूनही काहीजण दहशतवाद्यांना मदत करत आहेत. चिनाब आणि पीर पंजाल प्रदेशात हे सक्रिय असल्याची माहिती आहे.
2024 मध्ये 61 दहशतवादी ठार
सुरक्षा दलांच्या डेटानुसार 2024 मध्ये 61 दहशतवादी ठार झाले, तर 2023 मध्ये 60 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यापैकी 45 दहशतवादी J&K मधील एनकाउंटरमध्ये, 16 दहशतवादी LoC वरील घुसखोरीदरम्यान ठार करण्यात आले. याच कालावधीत 21 पाकिस्तानी दहशतवादी, 28 सामान्य नागरिक आणि 16 सुरक्षा जवानांनाही जीव गमवावा लागला. सुरक्षा दलांच्या मजबूत टॅक्टिक्समुळे स्थानिक सपोर्ट कमी झाला होता, परंतु आता "व्हाइट कॉलर" जैश मॉड्यूलचा उलगडा आणि लाल किल्ला कार बॉम्ब प्रकरणामुळे परिस्थितीत बदलली आहे.
नव्या "व्हाइट कॉलर" मॉड्यूलची भीती
पहलगाम हल्ल्यानंतरच्या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांनी 12 टॉप दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. आता दिल्ली स्फोटानंतर नव्याने उदयास येत असलेले हे "व्हाइट कॉलर" दहशतवादी नेटवर्क सामान्य लोकांमध्ये मिसळून कारवाया करू शकते, अशी भीती आहे. दिल्ली ब्लास्टनंतर J&K, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पसरलेल्या या नेटवर्कवर कारवाई करण्यात आली असली, तरी या मॉड्यूलची खरी व्याप्ती किती मोठी आहे, याचा अंदाज सुरक्षा यंत्रणांना अद्याप आलेला नाही.