अंधश्रद्धेचा भयानक अंत! 'महाकाल बळी मागत आहेत' म्हणत तरुणाने कुऱ्हाडीने स्वतःची मान कापली; एटावाह हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 09:20 IST2026-03-24T09:20:06+5:302026-03-24T09:20:24+5:30
Mahakal Sacrifice Etawah News: उत्तर प्रदेशातील एटावाहमध्ये अंधश्रद्धेचा भयंकर प्रकार. 'महाकाल बळी मागत आहेत' म्हणत तरुणाने कुऱ्हाडीने स्वतःची मान कापली. वाचा एटावाहमधील या थरारक घटनेची माहिती.

अंधश्रद्धेचा भयानक अंत! 'महाकाल बळी मागत आहेत' म्हणत तरुणाने कुऱ्हाडीने स्वतःची मान कापली; एटावाह हादरले
एटावाह जिल्ह्यातील जसवंतनगर परिसरात एका ३५ वर्षीय तरुणाने स्वतःची मान कुऱ्हाडीने कापून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 'महाकाल बळी मागत आहेत' असे ओरडत या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले. राजेश असे या मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश गेल्या काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता आणि देवाच्या भक्तीत पूर्णपणे बुडाला होता. मंगळवारी सकाळी त्याने घरातील कुऱ्हाड घेतली आणि 'महाकाल बळी मागत आहेत, मला बळी द्यायचा आहे' असे ओरडू लागला. घरच्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणालाही काही समजण्यापूर्वीच त्याने कुऱ्हाडीने स्वतःच्या मानेवर सपासप वार केले.
जागीच मृत्यू आणि पोलिसांची धाव
कुऱ्हाडीचे वार इतके भीषण होते की राजेशचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राजेशला पाहून कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. माहिती मिळताच जसवंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासात हा प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याचे समोर येत आहे.
गावात दहशतीचे वातावरण
राजेश हा शांत स्वभावाचा होता, पण गेल्या काही दिवसांपासून तो विचित्र वागत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन कोणी स्वतःचा असा जीव घेऊ शकतो, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली जात आहे.