देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात, एक्स्प्रेसवेवर ट्रकने कारला ४ किमीपर्यंत फरफटत नेले, ४ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 10:30 IST2026-01-27T10:29:13+5:302026-01-27T10:30:50+5:30
Accident News: दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर एक कार आणि अज्ञान वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. एका कारमधून पाच जण महाकालाचं दर्शन घेऊन उज्जैन येथून नोएडा येथे परतत होते. त्यावेळी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवरील चेनेज क्रमांक १९४ जवळ हा अपघात झाला.

देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात, एक्स्प्रेसवेवर ट्रकने कारला ४ किमीपर्यंत फरफटत नेले, ४ जणांचा मृत्यू
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर एक कार आणि अज्ञान वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. एका कारमधून पाच जण महाकालाचं दर्शन घेऊन उज्जैन येथून नोएडा येथे परतत होते. त्यावेळी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवरील चेनेज क्रमांक १९४ जवळ हा अपघात झाला.
या अपघाताबाबत पोलिसांनी सांगितले की, अपघातग्रस्त कार ही हरियाणामधील असल्याचे तिच्या क्रमांकावरून दिसत असून, कारमधून पाच जण प्रवास करत होते. हे सर्वजण उज्जैन येथील महाकालचे दर्शन करून नोएडा येथे परतत होते. याचदरम्यान, ही भरधाव कार एका अज्ञात वाहनाला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, त्यात या कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालकाने या कारला अनेक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले, अशी धक्कादायक माहिती या अपघातात जिवंत वाचलेल्या तरुणाने दिली आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पापडदा आणि नांगल राजावतान पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अपघातात बचावलेल्या जखमी तरुणाला त्वरित जवळच्या रुग्णालयात पोहोचवले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र ते हरियाणामधील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहेत. तसेच पोलिसांनी अपघातग्रस्त कारमधील चारही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.