रील पाहता पाहता श्वास थांबला, पलंगावर बसलेल्या १० वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:45 IST2026-01-06T15:45:11+5:302026-01-06T15:45:59+5:30
पलंगावर बसून रील पाहणाऱ्या १० वर्षांच्या मयंकसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे.

फोटो - आजतक
पलंगावर बसून रील पाहणाऱ्या १० वर्षांच्या मयंकसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. त्याचा रील पाहता पाहता मृत्यू झाला. अमरोहा जिल्ह्यातील मंडी धनोरा भागात ही वेदनादायक घटना घडली आहे. चौथीत शिकणाऱ्या मयंकच्या अचानक झालेल्या मृत्यूने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. डॉक्टरांनी मुलाचा मृत्यू हार्ट अटॅक झाल्याचं सांगितलं आहे, परंतु शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार केल्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण समोर येऊ शकलं नाही.
शेतकरी दीपक कुमार आपल्या कुटुंबासह गावात राहतात. पत्नी पुष्पा देवी, मोठा मुलगा मयंक आणि धाकटा मुलगा शिवम असं त्यांचं चौकोनी कुटुंब होतं. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास मयंक घरातील पलंगावर बसून मोबाईलवर रील पाहत होता. अचानक मयंक पलंगावरून खाली पडला. सुरुवातीला नातेवाईकांना वाटलं की कदाचित चक्कर आली असेल, पण जेव्हा त्याने कोणतीही हालचाल केली नाही, तेव्हा घरात एकच खळबळ उडाली. आई मुलाला हाका मारू लागली, वडिलांनी त्याला तातडीने उचललं आणि उशीर न करता डॉक्टरांकडे धाव घेतली.
नातेवाईक मुलाला घेऊन जवळच्या डॉक्टरांकडे आणि नंतर धनोरा येथील एका खासगी रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयातील डॉक्टर अवनीश गिल यांनी मुलाची नाडी, रक्तदाब आणि इतर आवश्यक तपासण्या केल्या. तपासणीनंतर त्यांनी मयंकला मृत घोषित केले. ही बातमी ऐकताच नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आई पुष्पा देवी यांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे.
रुग्णालयातून मृतदेह घरी आणण्यात आला. गावात बातमी पसरताच लोकांची गर्दी जमा झाली. मोठ्या धक्क्यात असलेल्या नातेवाईकांनी शवविच्छेदन न करताच मुलावर अंत्यसंस्कार केले. शवविच्छेदन न झाल्यामुळे मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. डॉक्टरांचे प्राथमिक मत हार्ट अटॅक असं आहे. जास्त वेळ मोबाईल पाहिल्यामुळे मुलाची प्रकृती बिघडली, असं काहींचं म्हणणं आहे.