अमृतसरमध्ये बाईकस्वारांनी मंदिरावर फेकला ग्रेनेड; स्फोटाचा भीषण व्हिडीओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 13:49 IST2025-03-15T13:49:29+5:302025-03-15T13:49:53+5:30

पंजाबमध्ये रात्री एका मंदिरावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला.

Temple was attacked in Amritsar two bike riding youths attacked with a grenade | अमृतसरमध्ये बाईकस्वारांनी मंदिरावर फेकला ग्रेनेड; स्फोटाचा भीषण व्हिडीओ समोर

अमृतसरमध्ये बाईकस्वारांनी मंदिरावर फेकला ग्रेनेड; स्फोटाचा भीषण व्हिडीओ समोर

Punjab Grenade Attack:पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच हादरवणारी घटना समोर आली आहे. पंजाबच्या अमृतसरमध्ये एका मंदिरावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. बाईकवरुन आलेल्या दोन तरुणांनी मंदिराच्या दिशेने ग्रेनेड फेकला. ग्रेनेडच्या स्फोटानंतर मंदिराचे मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी परिरसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

अमृतसरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. खांडवाला भागातल्या ठाकूर मंदिरावर बाईकवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी ग्रेनेड फेकला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाईकवर मागे बसलेला तरुण ग्रेनेड फेकताना दिसत आहेत. ग्रेनेडच्या स्फोटात मंदिराच्या भिंतीला तडे गेले असले तरी कोणीही जखमी झाले नाही. मंदिराच्या वरच्या मजल्यावर पुजारी आणि त्यांचे कुटुंबिय राहत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दोन तरुण मंदिराजवळ बाईक थांबवून ग्रेनेड फेकताना दिसत आहेत. हा स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतींच्याही काचा फुटल्या. पोलिसांनी रात्री २ वाजता मंदिराच्या पुजाऱ्याकडून घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.

या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असण्याची शक्यता अमृतसरचे पोलीस आयुक्त गुरप्रीत भुल्लर यांनी व्यक्त केली. "पाकिस्तान वेळोवेळी अशा प्रकारची कृत्ये करत असतो. आम्ही या प्रकरणाचा कसून तपास करत आहोत आणि आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहोत," असं पोलीस आयुक्त गुरप्रीत भुल्लर यांनी सांगितले.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली. "पंजाबमध्ये वेळोवेळी अस्वस्थता आणण्यासाठी काही घटकांकडून प्रयत्न केले जात आहेत. पंजाब पोलिस सक्रिय आहेत. जोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, पंजाब ठीक आहे. पाकिस्तान नियमितपणे ड्रोन पाठवत आहे, म्हणूनच ते अशा गोष्टी करत आहेत," असं मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले.

दरम्यान, पंजाबमध्ये गेल्या चार महिन्यांतील अशा प्रकारची ही बारावी घटना आहे. यापूर्वी पोलीस आस्थापनांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Web Title: Temple was attacked in Amritsar two bike riding youths attacked with a grenade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.