व्हॉट्सअॅप कॉलवरुन डॉक्टर करत होती महिलेवर उपचार; जुळ्या मुलांचा गर्भातच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 17:07 IST2025-05-06T17:01:29+5:302025-05-06T17:07:42+5:30
तेलंगणामध्ये व्हिडीओ कॉलवर केलेल्या शस्त्रक्रियेमुळे दोन जुळ्या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

व्हॉट्सअॅप कॉलवरुन डॉक्टर करत होती महिलेवर उपचार; जुळ्या मुलांचा गर्भातच मृत्यू
Telangana 'Video Call' Treatment: पुण्यात गर्भवती महिलेल्याचे मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच तेलंगणामधून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. तेलंगणामध्ये शस्त्रक्रियेदरम्यान, दोन जुळ्या बाळांचा गर्भातच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे ही शस्त्रक्रिया चक्क व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलवरुन सुरु होती. त्यामुळे दोन जुळ्या बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत महिलेच्या कुटुंबियांनी रुग्णालयात गोंधळ घातला. पोलिसांनी याप्रकरणी रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात हा सगळा प्रकार घडला. २६ वर्षीय बत्ती कीर्ती ही पाच महिन्यांची गर्भवती होती. बत्ती कीर्तीच्या जुळ्या बाळांचा गर्भाशयातच मृत्यू झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. खाजगी रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप कीर्तीच्या कुटुंबियांनी केला. कारण कीर्तीवर उपचार करणारी डॉक्टर व्हिडिओ कॉलद्वारे परिचारिकांना सूचना देत होती आणि शस्त्रक्रिया करण्यास सांगत होती. पोलिसांनी तक्रार मिळताच विजय लक्ष्मी रुग्णालयाच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १०६(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात वर्षांपूर्वी बत्ती कीर्तीचे लग्न झालं होतं. पाच महिन्यांपूर्वी, तिला इन व्हिट्रो फर्टिलायझेशनद्वारे गर्भधारणा झाली. बत्ती कीर्ती ६ एप्रिल रोजी विजया लक्ष्मी रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी डॉ. व्ही. अनुषा रेड्डी यांनी कीर्तीचे गर्भाशय सैल झाल्याचे पाहिले. या प्रकरणात, डॉक्टरांनी गर्भाशयाभोवतीचा भाग टाके घालून तिला घरी पाठवले. महिन्याभरानंतर चार मे रोजी कीर्तीला पोटात असह्य वेदना सुरु झाल्या. त्यामुळे तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टर अनुषा रेड्डी त्यावेळी तिथे नव्हत्या. त्यामुळे कीर्तीला दुसऱ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला द्यायला हवा होता. मात्र रुग्णालयाने तसे केले नाही.
रुग्णालय प्रशासनाने व्हिडीओ कॉलवरच कीर्तीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. रेड्डी यांनी परिचारिकांना कीर्तीला वेदना नियंत्रित करण्यासाठी इंजेक्शन देण्यास सांगितले. पण या इंजेक्शन्समुळे वेदना कमी झाल्याच नाहीत. तसेच तिच्या गर्भाशय ग्रीवामधील टाकेही तुटले. त्यानंतर १०.३० सुमारास गर्भाशयातून जुळ्या बाळांना बाहेर काढण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. डॉ. रेड्डी तिथे पोहोचल्यावर त्यांनी कीर्तीला वाचवले. मात्र जुळ्या बालकांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच कीर्तीच्या कुटुंबियांना संताप अनावर झाला. तिच्या कुटुंबियांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घालत कठोर कारवाईची मागणी केली. कुटुंबातील सदस्यांनीच्या तक्रार दाखल रंगारेड्डी जिल्हा वैद्यकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतली. आरोग्य विभागाच्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.